काँग्रेसने 60 वर्षात विकास केला नाही ते दक्षिणेत काय करणार...
काँग्रेसने 60 वर्षांत काय विकास केला; देवेंद्र फडणवीस यांची टीका...
कराडला अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ महायुतीची विराट सभा
कराड, दि. 15 (प्रतिनिधी) या देशात गेली 60 वर्ष काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी नेमका काय विकास केला, हे सांगावे. तीच स्थिती कराड दक्षिण मध्येही आहे. कराड दक्षिण मध्ये आनंदराव चव्हाण, प्रेमिलाकाकी चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या चव्हाण कुटुंबीयांकडे लोकप्रतिनिधित्व असताना त्यांनी कराड दक्षिणसाठी काय केले. मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी फुटकी कवडीही दिली नाही. त्यामुळे प्रचारात त्यांच्याकडे सांगायला विकासकामांचे मुद्देच नाहीत, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली केली.
कराड येथे महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी भगवंत खुबा, खा. उदयनराजे भोसले, जेष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजप - महायुती सरकारने केलेली कामे आम्हीच केली असल्याचे सांगण्याची वेळ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आली असल्याचा टोला लगावत ना. फडणवीस म्हणाले, कराडला महामार्गावर होणारा उड्डाणपूल आम्हीच केला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण सांगत आहेत. परंतु, महामार्गावरील सर्वच पुल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या पैशांतून होत आहेत. जो विकास झाला, तो आम्हीच केल्याचे सांगण्याची प्रवृत्ती बरी नव्हे. मुख्यमंत्री असताना शिवाजी स्टेडियमसाठी त्यांनी फुटकी कवडीही दिली नाही. अतुलबाबांच्या मागणीवरून मी शंभर कोटी दिले. तुम्ही केलेल्या कामांचेच श्रेय घ्या. केलेल्या कामांचे श्रेय जनताच देत असते. ते मागावे लागत नाही. खरंतर पुणे - कोल्हापूर महामार्गाच्या कामाचे खरे श्रेय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे असून त्यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.
ते पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी असलेली जागा संबंधितांच्या नावावर करून त्याठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यात काही अडथळे आले. नंतर उपमुख्यमंत्री असताना जमीन खाजगी मालकीची असली तरी त्याची मालकी संबंधितांना देऊन त्याठिकाणी घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला. आता
डॉ. अतुलबाबा यांनी केलेल्या मागणीची दखल घेत कराडच्या पाटण कॉलनी व मलकापुरातील झोपडपट्टी वासियांना आपण पक्की घरे बांधून देऊ. पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत अतुलबाबा पक्क्या घरात राहणाऱ्या लोकांकडेच मते मागतील. असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. तसेच भोसले कुटुंबियांनी वैद्यकीय विद्यापीठ, कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा बँक, पतसंस्था, अन्य शिक्षण समूहाच्या माध्यमातून आरोग्य सुविधेसह मोठी रोजगार निर्मिती केली आहे. तसेच कोविड काळातही त्यांनी सातारा व सांगली जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार लोकांचा जीव वाचवण्याचे काम केले. आता कराडच्या एमआयडीसीला आपण फाईव्ह स्टार दर्जा देणार असून या ठिकाणी मोठे उद्योग येतील. त्या माध्यमातूनही लोकांच्या हाताला रोजगार मिळेल. यासाठी डॉ. अतुलबाबांना जनतेने विधानसभेत पाठवावे, असे आवाहनही ना. फडणवीस यांनी यावेळी केले.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, चव्हाण कुटुंबीयांनी 60 वर्षांत अनेक मंत्रिपदे भूषवताना कराड दक्षिण व सातारा जिल्ह्यासाठी कोणतेही ठोस काम आणले नाही. काँग्रेसच्या याच भूमिकांमुळे बालेकिल्ला राहिलेला सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे आता कराड दक्षिणमध्येही परिवर्तन अटळ असून मी ज्यावेळी लोकसभा निवडणूक जिंकलो. त्याचवेळी खरंतर अतुलबाबांचा विजय झालेला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, कराड दक्षिणमध्ये वाढलेल्या भाजपच्या ताकदीमुळे माजी मुख्यमंत्र्यांना शनिवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, पाटण कॉलनी सोडता येईना. एवढी त्यांच्यावर बिकट वेळ आली आहे. वडील, मातोश्री व स्वतः मंत्री, मुख्यमंत्रीपदी असताना त्यांना स्वतःच्या घरासमोरील झोपडपट्टी हटवता आली नाही. उलट झोपडपट्टीचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी आपल्या घराच्या कंपाउंडच्या भिंती उंचावून घेतल्या. दहा वर्षांत केलेल्या विकासावर बोलायला त्यांच्याकडे मुद्देच नाहीत. मात्र, आपण कृष्णा उद्योग समूहासह आता कराडच्या फाईव्ह स्टार एमआयडीसीच्या माध्यमातूनही मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करून कराडचे उद्योगनगरीत रूपांतर करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
आमच्या पेनला लकवा मारलेला नाही
"फाईलवर सही करताना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारतो" अशा जेष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत ना. फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. परंतु, आमच्या पेनला लकवा मारलेला नाही. असे सांगत कराड दक्षिणमधील मतदारांनी डॉ. अतुलबाबांना आमदार करून पाठवावे. अतुलबाबांनी केलेल्या विकासकाकांच्या मागणीपत्रांवर मी नॉनस्टॉप सह्या करेन, अशी ग्वाहीही उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पृथ्वीराज चव्हाण आंतरराष्ट्रीय मटेरियल
गेल्या दहा वर्षांत कराड दक्षिणमधील जनतेकडून चूक झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे बुद्धिवान नेतृत्व आहेत. त्यामुळे मुळात ते विधानसभेचे मटेरियल नसून आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत. असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच कराड दक्षिणच्या जनतेने त्यांना दक्षिणेत अडकवून न ठेवू नये, अशी खोचक टिपण्णी करत यावेळी कराड दक्षिणच्या जनतेने आपली चूक सुधारून डॉ. अतुलबाबांच्या रूपाने तरुण, तडफदार, गतिमान नेतृत्व विधानसभेत पाठवावे, असे आवाहनही ना. फडणवीस यांनी केले.
अतुलबाबांना वरूनराजाचा कौल
सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करत असताना विजांच्या गडगडाटासह मोठ्या पावसाला सुरुवात झाली. यावेळी ना. फडणीस म्हणाले, वरूनराजानेही डॉ. अतुलबाबांना कौल दिला आहे. आता कराड दक्षिणच्या जनतेनेही मतांचा पाऊस पाडावा.
Comments
Post a Comment