तीन कोटीच्या लूटप्रकरणी कराड तालुक्यातील दोन संशयित ताब्यात....
तीन कोटीच्या लूटप्रकरणी कराड तालुक्यातील दोन संशयित ताब्यात...
कराड, दि. 16 (प्रतिनिधी) मुंबईहून हुबळी येथे तीन कोटी रुपयांची रक्कम घेऊन निघालेली कार कराड नजिक अज्ञात पाच जणांनी अडवून लुटल्याची फिर्याद कराड शहर पोलिसात दाखल झाली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री शहरा नजीकच्या मलकापूर येथे घडली असून पोलिसांनी या प्रकरणी कराड तालुक्यातील दोघा संशयतांना ताब्यात घेतले असून तीन जण फरार झाले आहेत. याच्या पुढील तपासासाठी पाच पथके रवाना झाली आहेत.
दरम्यान या लूट प्रकरणाचे कनेक्शन कराड तालुका व शहराशी संबंधित असून पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करत पाच पैकी दोन संशयतांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे, तर अन्य तीन फरार आरोपींच्या शोधार्थ विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहेत. उद्यापर्यंत या लूट प्रकरणाचा संपूर्ण खुलासा होणार असल्याचे समजते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विंग ता. कराड येथील अवधूत कणसे यांचा रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने वेगवेगळ्या पार्टीकडून घेऊन ते संबंधित पार्टीला पोहोचण्याची काम करतात. त्यांच्या क्रेटा गाडी एम एच 12 एम एल 6005 या गाडीवर ड्रायव्हर असणारे शैलेश घाडगे वय 24 रा. निमसोड ता. खटाव व अविनाश घाडगे हे कणसे यांच्या सांगण्यावरून 14 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता मुंबई येथील एका पार्टीचे तीन कोटी रुपये रोख रक्कम घेऊन क्रेटा गाडीतून हुबळीकडे निघाले होते.
क्रेटा गाडी रात्री दीड वाजता मलकापूर ता. कराड गावच्या हद्दीत आल्यानंतर पाठीमागून आलेल्या स्विफ्ट गाडीने त्यांना आडवी मारून थांबवले. याच दरम्यान दोघेजण मोटरसायकल वरून त्या ठिकाणी आले. आमची गाडी का दाबली म्हणून या अनोळखी इसमानी क्रेटा गाडीची हॉकी स्टिकने काच फोडून मारहाण करत चाकूचा धाक धाकवत जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने क्रेटा गाडीत बसून गाडी विंग ता. कराड गावचे दिशेने जाण्यास भाग पाडले. गाडी गमेवाडी घाटात थांबवून तुमच्याजवळ काय आहे ते तुम्ही काढून द्या अन्यथा जीवे मारू असा दम घाडगे यांना दिल्यानंतर गाडीतील तीन कोटी रुपयांची रक्कम घाडगे यांनी त्या अनोळखी तिघांकडे काडून दिली.
दरम्यान या अनोळखी इसमानी शैलेश व अविनाश घाडगे यांचे डोळे रुमालाने बांधले. तेवढ्यात एक चार चाकी गाडी त्या ठिकाणी आल्यानंतर क्रेटा मधील रोख रक्कम घेऊन ती गाडी निघून गेली. त्यानंतर अनोळखी इसमानी क्रेटा गाडी नांदलापूर येथे आणल्यानंतर गाडीतून उतरून तुम्ही गाडी कोल्हापूरच्या दिशेने जा अन्यथा जिवे मारू अशी धमकी देऊन ते निघून गेली.
शैलेश व अविनाश हे गाडी घेऊन कासेगाव पर्यंत जाऊन परत कराडच्या दिशेने येऊन ढेबेवाडी फाटा येथे थांबून घडलेला प्रकार गाडी मालक कणसे यांना सांगितला. त्यानंतर कराड शहर पोलिसात पाच अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दाखल झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी कराड पोलिसांनी कराड तालुक्यातील दोघा संशयतांना ताब्यात घेतले असून अन्य तीन आरोपींच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली असून या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments
Post a Comment