विलासराव पाटील - उंडाळकरांची सहकारातील शिस्त प्रेरणादायी : आ. पृथ्वीराज चव्हाण...
म्हासोली : येथील विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारत उद्धघटन समारंभात माजी अध्यक्षांचा सत्कार करताना आ. पृथ्वीराज चव्हाण, समवेत अॅ ड. उदयसिंह पाटील व इतर.
विलासराव पाटील - उंडाळकरांची सहकारातील शिस्त प्रेरणादायी : आ. पृथ्वीराज चव्हाण...
म्हासोलीत विकास सेवा सोसायटीचे उद्घाटन ; आजी - माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार...
कराड दि.27-: विलासराव पाटील - उंडाळकर यांची सहकारात वेगळी शिस्त होती. त्यांनी व यशवंतराव मोहिते यांनी जनतेच्या भल्यासाठी अनेक सार्वजनिक निर्णय घेतले. त्या दोघांनी कोणताही स्वार्थी निर्णय घेतला नाही. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हाच खरा विचार आहे. हा विचार जोपासत मी मतदारसंघातील विकासाला विशिष्ठ उंचीवर नेले. या मतदारसंघात यशवंतराव मोहिते आणि विलासराव पाटील - उंडाळकर यांनी जोपासलेला विचार वाढवूया. व कराड दक्षिणमधील धनदांडग्यांचे समाजकारण आपण मोडून काढूया. येत्या दोन महिन्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरील खूण आहे. आघाडी सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणला आणखी सक्षम करुया. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
म्हासोली (ता. कराड) येथील म्हासोली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारत व व्यापारी संकुलाच्या उद्धघटन समारंभात ते बोलत होते. धारेश्वरचे मठाधिपती डॉ. निळकंठ शिवाचार्य महाराज अध्यक्षस्थानी होते. यावेळी चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, खटाव शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजीव मुलाणी, कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील - चिखलीकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, नितीन थोरात, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजीराव काकडे, संचालक शिवाजीराव गावडे, कराड तालुका खरेदी - विक्री संघाचे उपाध्यक्ष जे. डी. मोरे, प्रतापराव देशमुख, कोयना सहकारी दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, संचालक तानाजीराव शेवाळे, शिवाजीराव शिंदे, शिवाजीराव गरुड, अधिकराव गरुड, उदय पाटील, शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे, माजी चेअरमन बी. एल. पाटील, कराड पंचायत समितीचे माजी सभापती किसनराव जाधव, म्हासोली सोसायटीचे चेअरमन हणमंत शेवाळे, व्हाईस चेअरमन आत्माराम देवकुळे, सर्व संचालक, सरपंच सुमती पाटील, उपसरपंच रवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, सहकारातील पायाभूत संस्था ह्या विकास सेवा सोसायटी आहेत. हे जाणून विलासकाकांनी या प्राथमिक संस्था मजबूत झाल्या पाहिजेत, हा दृष्टीकोन कायम ठेवला. सेवा सोसायटीच्या चालकांनी मन लावून त्या वाढवल्या पाहिजेत. विलासकाकांचा विकासाचा आदर्श घेवून मी आणि उदयसिंह पाटील हातात हात घालून एकदिलाने चाललो आहे.
ते म्हणाले, भाजप सरकारमुळे आताचे दशक वाया गेले. भाजप सरकार शेतमालाचे दर वाढले की, निर्यात बंदी करते. यातून ठराविक लोकांना फायदा करण्यासाठी हे चुकीचे धोरण केंद्र सरकार राबवत आहे. सोयाबीनला दर मिळत नाही. तसेच राज्यात एकही उद्योग येत नाही. बेरोजगारीचे संकट वाढत आहे. सरकार चालवण्यासाठी पैसे नसल्याने कर गोळा केला जात आहे. यामुळे महागाई वाढत आहे.
अॅ ड. उदयसिंह पाटील म्हणाले, विलासकाकांनी सहकारी संस्थांना राजाश्रय मिळवून दिला. त्यांनी शासनाच्या माध्यमातून मतदारसंघाची बांधणी केली. व यशवंतराव चव्हाण यांच्या पंचसूत्रीने सहकाराची उभारणी केली. यातून कराड दक्षिणेचा कायापालट झाला. कराड दक्षिणमधील विरोधी प्रवाह तुम्हाला वेगळे सांगून आपल्यात दुही करत आहेत. यातून त्यांना मतदारसंघात सरंजामदारी प्रस्थापित करायची आहे. या विरोधात विलासकाकांनी संघर्ष केला. विरोधकांचा डाव ओळखा. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठबळ द्या.
डॉ. निळकंठ शिवाचार्य महाराज म्हणाले, तरुणांनी देश पुढे नेला पाहिजे. कठीण परिस्थितीचे आपण चिंतन करणे गरजेचे आहे. सहकारात चालकांनी जबाबदारी सांभाळून काम करणे गरजेचे आहे.
राजीव मुलाणी म्हणाले, स्वांतत्र्य मिळण्याआधी डोंगरी भागात म्हासोलीत सोसायटी होती, हे पटत नाही. यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील - उंडाळकर व पृथ्वीराजबाबा ही उत्तुंग व्यक्तिमत्वे कराड दक्षिणमध्ये निर्माण झाली. हे इथल्या जनतेचे भाग्य आहे. त्यांच्यामुळे सामान्यांना सत्तेची बीजे चाटता आली. विलासकाकांनी कधी इमान विकले नाही. पृथ्वीराजबाबा आणि उदयदादा या दोघात कोणताच संशय ठेवू नका. पृथ्वीराजबाबा हेच विलासकाका समजा. आणि त्यांना येणाऱ्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करा.
मनोहर शिंदे म्हणाले, लाडकी बहिण योजनेत पृथ्वीराजबाबांनी विधानसभेत सुधारणा सुचवल्या. आमच्या विकासाची वस्तुस्थिती आहे. परंतु विरोधकांचे बॅनर दिशाभूल करणारे आहेत. विरोधक काहीतरी केल्याचा आव आणत आहेत.
प्रा. धनाजी काटकर म्हणाले, यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील - उंडाळकर व पृथ्वीराज चव्हाण यांच्या अंगावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. या तिघांनी कायम विकासाचा विचार केला. व मतदारसंघाचे परिवर्तन केले. अशा मोठ्या माणसांना कराड दक्षिणमधून तुम्ही निवडून दिले आहे, हा इतिहास लक्षात ठेवा.
यावेळी सोसायटीच्या माजी अध्यक्षांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व सभासदांना पाण्याच्या जारचे वाटप करण्यात आले. विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अशोक चव्हाण यांनी आभार मानले.
अजितराव पाटील - चिखलीकर यांनी भाषणात सभासदांच्या पैशातून उभा राहिलेल्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे आता मालक कोण आहेत, अशी विचारणा करत भोसले पिता - पुत्र हे छोटे अदानी आहेत. त्यांना खाजगी संस्थातून स्वतःचे साम्राज्य उभा करायचे आहे. त्यांच्या रुपी भांडवलदार वृत्ती मतदारसंघात येवू पाहत आहे, त्यांना तुम्ही थारा देऊ नका.

Comments
Post a Comment