शिवसंग्राम संघटनेत फूट, स्वराज्य संग्राम संघटनेची कराडात घोषणा...
शिवसंग्राम संघटनेत फूट, स्वराज्य संग्राम संघटनेची कराडात घोषणा...
कराड दि.1-स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेत फूट पडली असून नव्याने स्वराज्य संग्राम संघटनेची घोषणा आज संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी कराड येथे केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत स्वराज्य संग्राम संघटनेची घोषणा करत असल्याची माहिती यावेळी तानाजी शिंदे यांनी दिली. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजितराव बानगुडे यांच्यासह विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबई येथे अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय पातळीचे स्मारक त्वरित उभारले पाहिजे, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, महाराष्ट्रातील शेतकरी वाचण्यासाठी एक वेळ संपूर्ण कर्जमाफी शासनाने केली पाहिजे या विविध विषयांना घेऊन स्वराज्य संग्राम संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात वाढत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी स्वराज संग्राम लढा उभा करणार असून छत्रपती शिवराय व तमाम महाराष्ट्राचे दैवत असलेल्या रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराचा शासनाने जीर्णोद्धार करणे गरजेचे असल्याचे सांगून शिंदे यांनी महाराष्ट्रात सुरू असलेली कंत्राटी पद्धतीवरील भरती बंद करून महाराष्ट्रातील युवकांना न्याय देण्यासाठी त्वरित सर्व विभागातील सर्व नोकर भरती सुरू करावी अशी मागणी केली.
राज्यात महिलांच्या संरक्षणासाठी व विकासासाठी कायमस्वरूपी उपाय योजना शासनाने केल्या पाहिजेत असे सांगून तानाजीराव शिंदे म्हणाले सारथी संस्थेची व्याप्ती राज्य शासनाने वाढवली पाहिजे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने थेट कर्ज योजना सुरू केली पाहिजे यासह विविध मुद्द्यांची पूर्तता करण्यासाठी स्वराज्य संग्राम संघटना संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभा करणार असून त्यासाठी जनजागृती, सभा, मेळावे, संपर्क यात्रा, धरणे आंदोलन यासारख्या सनदशीर मार्गाने वाटचाल करून महाराष्ट्रातील समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य यापुढे स्वराज संग्राम संघटना करेल असा विश्वास यावेळी तानाजीराव शिंदे यांनी व्यक्त केला.
येत्या 15 सप्टेंबर 2024 रोजी पंढरपूर येथे स्वराज्य संग्रामचे पहिले अधिवेशन बोलवण्यात आल्याची माहिती यावेळी शिंदे यांनी दिली. या अधिवेशनात संघटनात्मक बांधणी त्याचबरोबर पदाधिकारी निवडी व अनेक महत्त्वपूर्ण ठराव, स्वराज संग्रामची पुढील दिशा या अधिवेशनात ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
मालवणीतील राजकोट वरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने बोलताना तानाजीराव शिंदे यांनी याप्रकरणी जे दोशी असतील त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली.

Comments
Post a Comment