बेकायदेशीरीत्या दारू विक्री प्रकरणी आरोपीस तीन वर्षाची सक्त मजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा...
बेकायदेशीरीत्या दारू विक्री प्रकरणी आरोपीस तीन वर्षाची सक्त मजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा...
महाराष्ट्र दारूबंदी कायदयाअंतर्गत शिक्षेचा कराड न्यायालयाचा पहिलाच निकाल...
कराड, दि.2 बेकायदेशीररित्या दारू विक्री करण्याकरता दारू कब्जात बाळगल्या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ई अन्वये दोषी पकडून कराड येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम व्ही भागवत यांनी आरोपीस तीन वर्ष सक्त कारावास व पंचवीस हजार रुपये दंड, दंड न भरलेस तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली.
कैलास हणमंत अर्जुगडे (वय ५८ वर्ष) रा.हनुमानवाडी ता. कराड असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. कराड न्यायालयाच्या आजवरच्या इतिहासात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत प्रथमच शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, ४ जुलै २०१७ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मौजे शिवडे ता. कराड गावचे हद्दीत यातील शिक्षा झालेला आरोपी कैलास हनमंत अर्जुगडे याचे मालकीच्या खोलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने छापा टाकला होता. त्यावेळी आरोपीकडे बेकायदा बिगर परवाना देशी-विदेशी दारूच्या १८० मिलीच्या एकूण ३९५४ रुपयेच्या सीलबंद काचेच्या बाटल्या असा एकूण २ लाख ८ हजार ५६४ रुपयांचा बेकायदा बिगर परवाना साठा मिळून आला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष जाधव यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखा साताराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तपासी अधिकारी जे एच माने यांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून रासायनिक अहवालासह दोषारोपपत्र कराड येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सदरचा खटला कराड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम. व्ही. भागवत यांचे न्यायालयात सुरू होता.
यावेळी सरकार पक्षातर्फे एडवोकेट सौ.रूपालीराजे मोरे यांनी चार साक्षीदार तपासले होते. सरकारी पक्षाच्या साक्षीदारांनी दिलेली साक्ष व सरकारी वकील रूपालीराजे मोरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम व्ही भागवत यांनी आरोपीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई अन्वये दोषी पकडून आरोपी कैलास हणमंत अजुगडे यास तीन वर्ष सक्त कारावास व पंचवीस हजार रुपये दंड दंड न भरलेस तीन महिने साधा कारावास सुनावली.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कार्वेकर व प्रमोद पाटील यांनी पैरवी अंमलदार म्हणून काम पाहिले.

Comments
Post a Comment