राज्य शासनाकडून सहकारी साखर कारखान्यांना नेहमीच सहकार्य राहील-ना.शंभूराज देसाई...


राज्य शासनाकडून सहकारी साखर कारखान्यांना नेहमीच सहकार्य राहील-ना.शंभूराज देसाई...

देसाई कारखान्याचे चांगल्या कामकाजाबद्दल केले कौतुक...

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न...

दौलतनगर, दि. 31: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या उत्तम नियोजनामुळे विस्तारीकरण चे दोन्ही टप्पे पूर्ण झाले असून गत वर्षीचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला आहे. राज्यातील सहकारी साखर कारखानदारीपुढे अनेक समस्यांचा असून या समस्यांवर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून सहकारी साखर कारखान्यांना नेहमीच सहकार्य राहिल असे प्रतिपादन पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.

दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याच्या 54 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी लोकनेते बाळसाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा), व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे डॉ.दिलीपराव चव्हाण, अशोकराव पाटील, शशिकांत निकम, सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील, बळीराम साळुंखे, शंकरराव पाटील, विजय सरगडे, सर्जेराव जाधव, सुनिल पानस्कर, भागोती शेळके, बबनराव शिंदे, लक्ष्मण बोर्गे, सौ.दिपाली पाटील, जयश्री कवर, विजय पवार, विजय पानस्कर, बाळासाहेब पाटील, विलास गोंडाबे, पंजाबराव देसाई विजयराव जंबुरे,अभिजित पाटील,ॲङ डी.पी.जाधव,ॲङमिलिंद पाटील,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन संजय देशमुख, प्रकाशराव जाधव, आर.बी.पवार यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री ना. शंभूराज देसाई म्हणाले की " पाटण विधानसभा मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असून विहिरीवरचे तसेच कोयना काठ सोडला तर ऊसाचे बारमाही क्षेत्र नव्हते. लोकप्रतिनिधी म्हणून कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचे क्षेत्र वाढविण्याबरोबर कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जादा ऊस उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या माध्यमातून उपसा सिंचन योजना मंजूर करुन त्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्नशिल राहिलो. 

तारळे विभागात 50 मीटर हेडवर शेतीला शासन खर्चाने पाणी देण्याचा निर्णयात बदल करुन 100 मीटर हेडपर्यंत शेतीला पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता घेत तारळे धरण प्रकल्पांतर्गत पाच उपसा सिंचन योजनांची कामे सध्या पूर्णत्वाकडे जात आहेत. तर मोरणा गुरेघर बंदिस्त पाईप लाईनच्या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून नाटोशी उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. 

तारळी पॅटर्ननुसार मणदुरे विभागातील साखरी,चिटेघर व निवकणे प्रकल्पातील पाणी 100 मीटर हेडवरील शेतीला देण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार याचाही प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असून या योजना पूर्ण झाल्यानंतर कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येऊन कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस आपल्या कारखान्याला गळीतास येऊन याचा फायदा आपल्या कारखान्याला होणार असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, कारखान्याची प्रगतीसाठी आर्थिक शिस्त गरजेची असून आपल्या कारखान्याने विस्तारवाढ करण्याचे काम करताना चांगले आर्थिक नियोजन केल्याने लवरक विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्याने कमी कालावधीमध्ये गळीत हंगाम पूर्ण होऊन खर्चाची बचत झाली.

दरम्यान भविष्यामध्ये कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचे उत्पादन वाढणार असल्याचे लक्षात घेऊन आपल्या कारखान्याने इथेनॉल प्रकल्पाचे उभारणीचे कामही भविष्यात हाती घ्यावे,राज्य सरकार नेहमीच पाठीशी ठामपणे उभे राहिल,असे सांगत ते पुढे म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी राज्यात शिवसेनेच्या राजकीय उठावाच्या आमच्या भूमिकेसंदर्भात अनेक जण शासंक होते मात्र खऱ्या अर्थाने आम्ही सत्तेसाठी नव्हे,अथवा पदासाठी नव्हे तर मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पाठीशी ठाम राहिलो आणि त्याचा परिणाम आजपर्यंत मतदारसंघात कधी झाला नव्हता एवढा प्रचंड विकास गेल्या अडीच वर्षात झाला याचा आपणाला अभिमान असल्याचे सांगून राज्य शासनाच्या माध्यमातून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध योजनांमधून विकास कामे सध्या मार्गी लावत आहेत.

यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पहिले प्रशिक्षण केंद्र वाटोळे या ठिकाणी होत आहे.तर कोयनानगर याठिकाणी राज्य आपत्ती दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून रासाटी हेळवाक येथील जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारा निर्मितीस जलपर्यटनाचा चांगला प्रकल्प मार्गी लागणार आहे.सातारा जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून शासनाच्या विविध योजना मतदारसंघामध्ये राबविण्यात तुम्हा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झालो असल्याचे सांगत कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस अन्यत्र जाऊ नये यासाठी संचालक मंडळ व ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी सांघिक प्रयत्न करावेत असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई म्हणाले की, यावर्षीपासून सर्व शेतकरी सभासद यांच्या सहकार्याने तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दोन गळीत हंगामाध्ये कमी खर्चामध्ये कारखान्याची क्षमता वाढ करत गळीत हंगाम यशस्वी केला. विस्तारवाढीमुळे कारखान्याचा गतवर्षेीचा गळीत हंगाम 71 दिवसांत झाला.कमी दिवसाच्या गळीत हंगामामुळे अन्य खर्चामध्ये मोठी बचत झाली.मात्र गेली अनेक वर्षापासून साखरेच्या किमान विक्रीच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांना ऊस दर देण्यात मोठी अडचण येत आहे.तरीही आपण ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करत आहोत. कारखान्याने भविष्यात चांगले आर्थिक नियोजन केले आहे.दरम्यान राज्य शासनाने आपल्या साखर कारखान्याला बिनव्याजी आर्थिक सहाय्य केल्यामुळे व्याजाची रक्कम वाचली त्याबद्दल राज्यशासनाचे आभार मानत ते पुढे म्हणाले की, गत गळीत हंगामामधील ऊसाची एफ.आर.पी.ची उर्वरित देय रक्कम लवकरच ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांचे खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे सांगत कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस अन्यत्र जाण्याच्या प्रमाणामध्ये गत गळीत हंगामाध्ये घट झाली असून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.

अशोकराव पाटील यांनी प्रास्ताविक स्वागत केले.नोटीस वाचन कार्यकारी संचालक सुहास देसाई यांनी केले.अहवाल वाचन वैभव जाधव यांनी केले. विषयपत्रिकेवरील सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येऊन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तर बबनराव शिंदे यांनी आभार मानले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक