विद्यानगर येथे दोघांकडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त...
कराड शहर डीबी पथकाची उल्लेखनीय कामगिरी; विद्यानगर येथे दोघांकडून पिस्टल जप्त...
कराड, दि. 12 (प्रतिनिधी) विद्यानगर येथे अवैधरित्या देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शताफिने ताब्यात घेतले आहे. काल गुरुवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून पोलिसांनी 65 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झीनसह जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अभिषेक राजेंद्र नांगरे (वय 23, रा. मोरया कॉम्प्लेक्स आगाशिवनगर, ता. कराड), निकेतन राजेंद्र पाटील (वय 34 रा. मारुल ता. पाटण) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती नुसार गुरुवारी दि .11 जुलै रोजी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस हवालदार शशिकांत काळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विद्यानगर कॉलेज रोडवर तारांगण बिल्डींग समोर एक जण व त्याचा साथीदार संयशितरित्या पिस्टल बाळगून फिरत आहेत. त्यानंतर कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड, शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख, मुकेश मोरे यांचे पथक तयार करून विद्यानगर येथील श्री शाहू गृह निर्माण संस्थाकडे जाणारे रोडवर तारांगण बिल्डींग समोरुन अभिषेक नांगरे व निकेतन पाटील हे बोलत चालत जात असताना वरील कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले.
यावेळी पोलिसांना चालत निघालेल्या त्या दोघांचा संशय आल्याने पोलीस हवालदार शशिकांत काळे व पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख यांनी गाडीतून खाली उतरून पळत जाऊन एका संशयितास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचा दुसरा साथीदार पळून जाऊ लागतात त्याला पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे व पोलीस हवालदार अमित पवार यांनी पळत जाऊन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्यांचेकडे विक्रीसाठी आणलेले विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झीनसह मिळून आले.
दरम्यान पोलिसांनी अभिषेक नांगरे व निकेतन पाटील या दोघांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. या प्रकाराचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डिसले करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, अशोक वाडकर, कुलदीप कोळी, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, संग्राम पाटील यांनी केली.
दरम्यान सातारा जिल्हा पोलीस दलाकडून नोव्हेंबर 2022 पासून आज पर्यंत 90 देशी बनावटीचे पिस्टल, तीन बारा बोअर बंदुक, एक रायफल, 199 जिवंत काडतुस, 385 रिकाम्या पुंगळ्या, एक रिकामे मॅगझीन असा मुद्देमाल जप्त करण्यात
आला आहे.

Comments
Post a Comment