छत्रपती उदयनराजें भोसले यांच्या विजयाचा कराडमध्ये जल्लोष...


छत्रपती उदयनराजें भोसले यांच्या विजयाचा कराडमध्ये जल्लोष...

कराड, दि. 4 (प्रतिनिधी) - सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा  32 हजार 771 मतानी पराभव केला. उदयनराजे भोसले यांना 5 लाख 71 हजार 134 मते तर शशिकांत शिंदे 5 लाख 38 हजार 363 मते मिळाली.उदयनराजे यांच्या विजयानंतर कराडमध्ये त्यांच्या समर्थकांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरातून दुचाकी रॅली काढत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

सातारा येथे सकाळी मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. काही फेऱ्यांमध्ये शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेतली होती. मात्र दुपारनंतर उदयनराजे भोसले हे आघाडीवर राहिले. ही आघाडी कायम राहिल्याने कराड शहरात त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष सुरु करण्यात आला. शहरातील दत्त चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. 

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विजयी घोषित...

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्यापेक्षा 32 हजार 771 इतकी मते अधिक मिळाली. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रमाणपत्र दिले. यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेन धिरण व आर अर्जुन यांच्या सह अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे आदी उपस्थित होते. 

उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची संख्या पुढीलप्रमाणे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले 5 लाख 71 हजार 134, शशिकांत जयवंतराव शिंदे 5 लाख 38 हजार 363, आनंद रमेश थोरवडे 6 हजार 485, प्रशांत रघुनाथ कदम  11 हजार 912, तुषार विजय मोतलिंग 1 हजार 301, सयाजी गणपत वाघमारे 2 हजार 501, डॉ. अभिजित वामनराव आवाडे बिचुकले 1 हजार 395, सुरेशराव दिनकर कोरडे 4 हजार 712, संजय कोंडिबा गाडे -37 हजार 62, निवृत्ती केरू शिंदे 2 हजार 674, प्रतिभा शेलार 1 हजार 123, सदाशिव साहेबराव बागल 958, मारुती धोंडीराम जानकर 3 हजार 951, विश्वजित पाटील उंडाळकर 3 हजार 438, सचिन सुभाष महाजन 2 हजार 15, सीमा सुनिल पोतदार 3 हजार 458, नोटा 5 हजार 522 या प्रमाणे मते मिळाली आहेत. तसेच अवैध मतांची संख्या एकूण 2 हजार 180 आहे. प्रदत्त मते 25 आहेत.

या निकालाने सणसणीत चपराक;डॉ. अतुलबाबा भोसले...

सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा झालेला विजय, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा विजय आहे. सातारा लोकसभेतील उदयनराजेंच्या विजयामुळे सातारा जिल्ह्यातील जनतेने नरेंद्र मोदींना देशात पुन्हा सत्तेवर बसविण्यासाठी पाऊल उचलले आहे. तसेच साताऱ्यात कधीच भाजपचा खासदार निवडून येणार नाही, असे म्हणणाऱ्या प्रवृत्तींना, जिल्ह्यातील समस्त जनतेने या निकालाने  सणसणीत चपराक दिली असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली आहे. 

मोदींचा हा नैतिक पराभव - आ. पृथ्वीराज चव्हाण...

2024 ची लोकसभा निवडणूक जनता विरुद्ध मोदी अशी होती. मोदींनी स्वतः ला देशापेक्षा स्वतःला मोठे समजले व मी म्हणजेच ह्या देशात सर्व चालणार या अविर्भावात प्रचार केल्याने भाजपला बहुमत मिळाले नसल्याने हा मोदींचा नैतिक पराभव असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

यावेळी बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,काँग्रेस पक्षाने जनतेचे मुद्दे घेऊन प्रचार केला तर मोदींनी जाती धर्माचे राजकारण केले, कोणतेही विकासाचे मुद्दे न घेता द्वेषपूर्ण प्रचार करीत देशातील वातावरण बिघडविण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. देशातील पहिले पंतप्रधान असतील ज्यांनी प्रचारातच स्वतःच्या नावाने प्रचार केला, काही निवडणुकीत तर देवाचा अवतार असून आईच्या पोटी जन्म न घेता माझा थेट पृथ्वीवर जन्म झाले असल्याचे हास्यास्पद विधान केले होते. मोदींचे ध्रुवीकरणाचे राजकारण जनतेने नाकारले आहे. महाराष्ट्रात अत्यंत अपेक्षितच निकाल लागला असून भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने जागा दाखवली आहे. 

सातारच्या निकालाबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, सातारा लोकसभेचा निकाल अत्यंत धक्कादायक निकाल आहे. सातारा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात अत्यंत चांगला प्रचार केला गेला होता. एकजुटीने सर्वांनी प्रचार करूनही झालेला पराभव धक्कादायक आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक