कराड पालिकेतील 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई;मुख्याधिकाऱ्यांकडून आंदोलनाची दखल; यशवंत आघाडीचे टाळे ठोको आंदोलन स्थगित...
कराड पालिकेतील 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई;मुख्याधिकाऱ्यांकडून आंदोलनाची दखल...
कराड दि.29-कराड नगरपालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी अन्यथा त्यांची गाढवावरून दिंड काढून नगरपालिकेस टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर आज आज मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने यशवंत विकास आघाडीचे टाळे ठोको आंदोलन स्थगित केल्याचे आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी माध्यमांना सांगितले.
यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी काल पत्रकार परिषद घेऊन कराड नगरपालिकेच्या कारभाराविषयी व पालिकेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने आज प्रत्यक्ष नगरपालिकेत यादव समर्थकांनी गाढव आणून आंदोलन केले मात्र नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते.
नगररचना विभागातील स्वानंद शिरगुप्पे व सचिन पवार यांच्यावरील कारवाईचा अधिकार हा मुख्याधिकारी यांच्याकडे नसल्याने त्यांची तक्रार नगररचना विभाग सातारा यांच्याकडे कारवाईसाठी पाठवली आहे. तर प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत नियुक्ती असणारे रणजित वाडकर व शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ निलेश तडाखे यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दिले. दोन्ही अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत तोंडी सूचना दिल्या पण त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. यावर तक्रार दाखल केल्याने दोघांनाही तात्पुरत्या सेवा कार्यातून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले तर नगरपालिका आस्थापनेवरील वामन संतोष शिंदे यांची बांधकाम विभागातून टाऊन हॉलमध्ये बदली करण्यात आली अशी माहिती मुख्याधिकारी खंदारे यांनी दिली.
कराड नगरपालिकेच्या आवारात आज 4 वाजता संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याच्या मागणीसाठी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव त्यांच्या समर्थकांसह पालिकेच्या आवारात दाखल झाले. यावेळी संबंधित नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची धिंड काढण्यासाठी गाढव आणण्यात आले होते. त्यामुळे नगर पालिकेत खळबळ उडाली. या आंदोलनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कराड शहर पोलीसही दाखल झाले होते. यावेळी राजेंद्रसिंह यादव, हणमंतराव पवार, निशांत ढेकळे, राजेंद्र माने किरण पाटील, सुधीर एकांडे, ओंकार मुळे व अन्य कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment