नगरपालिकेतील त्या अधिकाऱ्यांची बदली करा अन्यथा टाळे ठोक आंदोलन; राजेंद्रसिंह यादव...
नगरपालिकेतील त्या अधिकाऱ्यांची बदली करा अन्यथा टाळे ठोक आंदोलन; राजेंद्रसिंह यादव...
कराड दि.28-कराड नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात नगरपालिकेचे पर्यायाने कराडकरांचे फार मोठे नुकसान झाले असून नगरपालिकेत अंदाधुंद कारभार सुरू आहे. त्यामुळे कराड नगरपालिकेची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी अन्यथा कराड नगरपालिकेला टाळे ठोकण्यात येईल व नगररचना विभागातील त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून गाढवावरून धिंड काढण्यात येईल असा इशारा माजी उपनगराध्यक्ष व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी यशवंत विकास आघाडीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यादव पुढे म्हणाले की, कराड नगर परिषदेतील लोकनियुक्त बॉडीची मुदत सव्वादोन वर्षापूर्वी संपली, गेल्या दोन-सव्वादोन वर्षात कराड नगर परिषदेत प्रशासकीय कारभार सुरु आहे. या कालावधीत विविध विभागातील अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारी व्यवस्था नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या मध्ये बेदरकार वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत गेली. अधिकाऱ्यांच्या बेफिकीर व मनमानी कारभाराचा सर्वसामान्य कराडकरांना त्रास व्हायला लागला व आजही होत आहे, वेळेत कामे न करणे, पुर्णवेळ जागेवर नसणे, प्रचंड प्रमाणात पैशाची मागणी करणे, यामुळे कराडकर नागरीक हैराण झाले आहेत.
कराडकर नागरीकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच मनस्तापाबाबत यशवंत विकास आघाडीने आक्रमक भुमिका घेतली असून आंदोलन करणे, नगर परिषदेला टाळे लावणे हाच पर्याय निवडला असुन या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना कराडकरांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देणार आहोत. नगर परिषदेतील उर्मट व बेदरकार अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी होणं आवश्यक आहे. अशी मागणी नगर परिषदेच्या प्रशासकांकडे करण्यात आली असुन त्यांनी तातडीने संबंधीत अधिकायांवर कारवाई करावी. अन्यथा नगर परिषदेला टाळे लावण्यात येईल. कराडकर नागरीकांना होत असलेला मनस्ताप यशवंत विकास आघाडी कदापी सहन करणार नाही. असेही यादव शेवटी म्हणाले.

Comments
Post a Comment