उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करा; ना.चंद्रकांतदादा पाटील...
उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करा; ना.चंद्रकांतदादा पाटील...
कराड, दि. 2 लोकसभेची निवडणूक ही देशाचे धोरण काय असावे, हे ठरविणारी निवडणूक आहे. यावेळीही मोदीच निवडून येणार याची खात्री विरोधकांनाही आहे. त्यामुळे ‘अबकी बार ४०० पार’चे ध्येय्य साध्य करण्यासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी देशाचे हित बघणारे मोदी सरकार पुन्हा आणण्यासाठी, सातारा लोकसभेतून भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
भाजप महायुतीचे उमेदवार खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ गोवारे, ता. कराड येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, गोवारे विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश आज जगात पाचव्या स्थानावर आला आहे. मोदींनी दहा वर्षांच्या काळात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सर्वसामान्यांना आरोग्य योजनांचा लाभ दिला. मोफत स्वस्त धान्य दिले. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले. नवनवीन उद्योग उभारले. देश आणखी प्रगतीपथावर आणण्यासाठी, देशाच्या भवितव्यासाठी, तसेच देशाचे हित बघणारे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आणण्यासाठी सातारा लोकसभेतून भाजप महायुतीचे उमेदवार खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, आपल्या भागात मोठा विकासनिधी दिला. ज्याचा दीर्घ लाभ इथल्या लोकांना होताना दिसतोय. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांसाठी अनेक विकास योजना राबविल्या जात आहेत. विकासाची ही गंगा अव्याहतपणे सुरु ठेवण्यासाठी आणि विकसित भारताचे नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, उदयनराजे भोसले यांना खासदार म्हणून सातारा लोकसभेतून प्रचंड मतांनी निवडून पाठवावे.
यावेळी सोसायटीचे चेअरमन संपतराव पाटील, बळवंत देसाई, सागर भोसले, अमोल देशमुख, अनुप जाधव, ओम पाटील, ॲड. जितेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment