वारुंजी जॅकवेलला विद्युत पुरवठा करणाऱ्या कोयना पुलावरील केबल झाल्या खराब; पाणी पुरवठा उशिरा होणार...
वारुंजी जॅकवेलला विद्युत पुरवठा करणाऱ्या कोयना पुलावरील केबल झाल्या खराब; पाणी पुरवठा उशिरा होणार...
कराड दि.15-(प्रतिनिधी) शहराला वारुंजी येथील जॅकवेल मधून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी शहरातून जॅकवेल पर्यंत विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य केबल मध्ये बिघाड झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. मुख्य केबल मधून जॅकवेल साठी विद्युत पुरवठा न झाल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या पूर्ण भरू शकल्या नाहीत. त्यामुळे आज सकाळचा पाणीपुरवठा झाला नाही शिवाय सायंकाळचा पाणीपुरवठा उशिरा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान जॅकवेलला विद्युत पुरवठा करणाऱ्या कोयना पुलावरील मुख्य केबल खराब झाल्याने पुढे जॅकवेल पर्यंत विद्युत पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने विद्युत मंडळाच्या (एमएसईबी) कर्मचाऱ्यांसह जॅकवेल पर्यंतच्या विद्युत वाहिन्यांची तपासणी करत अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकल्या. त्यानंतर कोयना पुलानजीक मुख्य केबलची लाईन विद्युत खांबावरून ज्या ठिकाणी पुढे जाते त्या ठिकाणची ही सकाळपासून तपासणी सुरू केली होती. मात्र तपासण्याअंती कोयना पुलावरून पास झालेल्या मुख्य केबलच खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे.
कोयना पुलावरून मुख्य केबल टाकल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूला कचरा पेटून दोन वेळा केबल जळाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळीही या मुख्य केबलचा जळालेला भाग बदलून विद्युत पुरवठा सुरू ठेवला होता. याशिवाय या ठिकाणी केवळ एक केबल न ठेवता पर्यायी आणखी एक केबल होती. मात्र ती ही केबल आज खराब झाल्याचे प्राथमिक दर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळे सध्या विद्युत पुरवठा विभागासह नगर परिषदेच्या पाणी पुरवठा व तांत्रिक विभागापुढे अडचणी निर्माण झाले आहेत.
कोयना पुलावरून गेलेल्या या केबल आता बदलण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग व विद्युत पुरवठा नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले असून अन्य पर्यायी केबल मधून विद्युत पुरवठा घेऊन जॅकवेल सुरू करण्याचा प्रयत्न संबंधित विभाग करीत आहे. या कामास बराच कालावधी लागणार असून आज सायंकाळच्या पाणीपुरवठ्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या तसेच वापराच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आव्हान नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान जॅकवेलला वीज पुरवठा करणारी कोयना पुलावरील केबल नेमकी कोणत्या ठिकाणी खराब झाली आहे याची तपासणी करण्यासाठी विद्युत मंडळांने विशेष टीमला प्राचारण केले असून त्यानंतरच या केबलची दुरुस्ती होणार आहे. मात्र या दरम्यान नजीकच्या एका खाजगी संस्थेच्या वीजपुरवठा केबलच्या माध्यमातून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
राजू सनदी कराड

Comments
Post a Comment