लोकसभा निवडणूक; महायुतीच्या मेळाव्याला तीन विधानसभा मतदारसंघातून अल्प प्रतिसाद...
सर्वांना मिसळ खायला घेऊन जाणार; छत्रपती उदयनराजे भोसले...
कराड, दि. 8 (प्रतिनिधी) - गत निवडणुकीचा धागा पकडत छ.उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र पाटील यांना चिमटा काढत म्हणाले की, नरेंद्र पाटलांनी मला मिसळ खायला न्हेले नाही. पण आज व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना मी मिसळ खायला घेऊन जाणार असल्याची कोपरखळी यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी महायुतीच्या मेळाव्यात मारली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नसतानाही माजी आ.आनंदराव पाटील यांच्या पार्वती लॉनवर महायुतीचा कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र या तीन मतदारसंघातील बहुतांशी मतदारांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. तिन्ही विधानसभा मतदारसंघातील अपेक्षित गर्दी नसल्याने या मेळाव्या विषयी चर्चा रंगली होती. व्यासपीठावर उपस्थित अनेक नेत्यांचे चेहरे सर्व काही सांगून गेले.
महायुतीच्या या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजप नेते डॉ. अतुल भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, चित्रलेखा माने, सुनील काटकर, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, विक्रमबाबा पाटणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, केंद्रात दोन लोकांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या पक्षाची आज देशासह जगभरात सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळख आहे. ही नरेंद्र मोदी यांची किमया आहे. आपण त्यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचा प्रस्ताव मांडला होता. आज या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले असून येथील भूमी सुजलाम, सुफलाम झाली आहे. साताऱ्यासाठी महायुतीचे नेते जो कोणी उमेदवार देतील, त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मताधिक्याचा नवा विक्रम नोंदवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सातारा जिल्ह्याने देशाला दिशा देण्याचे काम केले. जिल्ह्यातील अनेक नररत्नांनी दिलेल्या योगदानामुळे देशासह महाराष्ट्रात साताऱ्याची ओळख आहे. याच विचारातून आणि प्रेरणेतून आतापर्यंत फक्त लोकहिताचेच समाजकारण केले असून काल, आज आणि उद्याही सर्वांच्या सेवेसाठी आपण ठामपणे उभे असू, असे प्रतिपादन खा. भोसले यांनी केले.
शंभूराज देसाई म्हणाले, देशाला मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे. उमेदवार कोणीही असो; मोदींच्या नावावर निवडणूकीला सामोरे जायचे आहे. येत्या पाच वर्षांत पहिल्या तीन जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे नाव असेल, असा मोदींचा प्रयत्न आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वात मोठा उठाव झाला. त्यांनी कोणाच्याही राजकीय भवितव्याला तडा जाऊन दिला नाही. लोकसभा निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करायला हवे. एकमेकांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही. बूथवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उभे राहून स्वतःचे बूथ प्लसमध्ये जातील, यासाठी प्रयत्न करावेत. हा विजय आपलाच असेल.
आज जगात भारताकडे सन्मानाने पाहिले जाते. काँग्रेसच्या काळात अशी परिस्थिती नव्हती. जगातील लोकप्रतिनिधी मोदींकडे आशेने आणि आदराने पाहतात. उदयनराजेच उद्याचे उमेदवार असतील. वरिष्ठ पातळीवर लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल. पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी निवडणुकीची जबाबदारी घ्यावी. राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी महायुतीच्या सोबत रहा. ऊसदर, साखर कारखानदारीला अमित शहांनी मोदींच्या नेतृत्वाखाली चांगले दिवस आणले. काँग्रेसने खाजगी कारखान्यासाठी एक आणि सरकारी कारखान्यासाठी एक असा न्याय देण्याची भूमिका घेतल्याचा आरोप यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला.
भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्याचे काम मोदी सरकारकडून होत आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात हातभार लावण्याचे काम मोडी सरकारने केले आहे. येणाऱ्या काळात महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. महायुतीच्या उमेदवाराला कराड दक्षिण मतदारसंघातून मोठे मताधिक्य देऊ, अशी ग्वाही सातारा लोकसभेचे प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी बोलताना दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी केले तर कराड दक्षिण तालुकाप्रमुख धनाजी पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यदव यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Comments
Post a Comment