कराडात हृदय रुग्णाला भुल न देता कोणतीही चिरफाडीशिवाय 'टावी' शस्त्रक्रिया...
संजीवन मेडिकल सेंटरचे डॉ. विजयसिंह पाटील यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील पहिलीच शस्त्रक्रिया...
कराड दि.3-: येथील प्रसिध्द हृदयरोग तज्ञ व इंटरव्हेन्शल कार्डिओलॉजीस्ट डॉ. विजयसिंह पाटील यांच्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये 'टावी (ट्रान्स कॅथेंटर अवॉर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट) ही गुंतागुतीची हृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वीपणे नुकतीच करण्यात आली. वयोवृध्द हृदयरोगी व्यक्तींवर प्रचलित बायपास शस्त्रक्रिया करणे काही वेळा धोक्याचे ठरू शकते याचा विचार करून ओपन हार्ट सर्जरी ही शस्त्रक्रिया टाळून ट्रान्सकॅथेटर अवॉर्टिक व्हाल्व रिप्लेसमेंट (टावी) ही अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया रुग्णास भुल न देता तसेच कोणीही चिरफाड न करता डॉ. विजयसिंह पाटील यानी यशस्वीरित्या केली आहे.
या शस्त्रक्रियेमध्ये मसूर ता. कराड येथील ज्येष्ठ नागरिक प्रसिध्द ज्योतिष विशारद श्री. ज्ञानेश्वर भोज (वय वर्ष ८८) यांच्या हृदयामध्ये कृत्रिम झडप बसवण्यात आली. अशा प्रकारची गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील पहिलीच घटना आहे.
याबाबत माहिती देताना डॉ. विजयसिंह पाटील म्हणाले की श्री. भोज यांना गेल्या काही वर्षापासून रक्तदाब, धाप लागणे, चक्कर येणे अशा प्रकारचा त्रास होत होता. वर्ष २०१९ मध्ये ते पहिल्यांदा रुग्णालयात आले तेव्हा तपासणीनंतर लक्षात आले की श्री. भोज यांना अवॉर्टिक व्हाल्व स्टेनॉसिस हा त्रास आहे. ज्यामध्ये त्यांच्या हृदयाची एक झडप पूर्णपणे उघडत अथवा बंद होत नसते. त्यामुळे ती झडप बदलणे महत्वाचे होते. त्यांचे वाढलेले वय कमी वजन यामुळे त्यांची बायपास शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. याचा विचार करून त्यांना 'टावी शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु श्री. भोज यांची त्यावेळी सदर शस्त्रक्रिया करून घेण्याची मानसिकता नव्हती. नंतरच्या कालावधीमध्ये धाप लागणे, चक्कर येणे व अन्य त्रास वाढल्यामुळे त्यांनी माझ्याकडे परत वैद्यकीय उपचार घेणे सुरू केले. यावेळी श्री. भोज व त्यांच्या कुटुंबियांना यावरती टावी हाच पर्याय असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी ही शस्त्रक्रिया करून घेण्यास संमती दिल्यानंतर ही शस्त्रक्रिया काही दिवसापूर्वीच संजीवन मेडिकल सेंटरमध्ये करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी संजीवन मेडिकल सेंटरचे चेअरमन डॉ. आर. एन. पाटील, प्रसिध्द भुलतज्ञ डॉ. सुहास पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. योगिता पाटील, डॉ. सोमनाथ साबळे डॉ. देवरे, डॉ. दिलीप सोळंकी, श्री. स्वप्नील साळुंखे, अमित चोपडे व संजीवन मेडिकल सेंटरचा सहकारी स्टाफ यांचे सहकार्य लाभले.
अशी झाली शस्त्रक्रिया...
या गुंतागुंतीचा हृदय शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेली अवांटिक व्हाल्वच्या (झडप) जागी कॅथेटरच्या सहाय्याने कृत्रिम झडप बसवण्यात आली. यासाठी जागेमध्ये एक छोटे छिद्र घेऊन कॅथेटर हृदयापर्यंत नेण्यात आला व झडप बदलून झाल्यानंतर कॅथेटर बाहेर घेण्यात आला. सदरची शस्त्रक्रिया ५ दिवसापूवच झाली असून रुग्ण ठणठणीत बरा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.
भुल न देता चिरफाड न करता यशस्वी हृदय शस्त्रक्रिया...
बहुतांश हृदय शस्त्रक्रिया रुग्णास भुल देऊन व चिरफाड करून करण्यात येतात. परंतु संजीवन मेडिकल सेंटर येथे डॉ. विजयसिंह पाटील यांनी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध केले असून टावी ही शस्त्रक्रिया करताना रुग्णास भुल देण्यात आली नाही. याशिवाय शस्त्रक्रियेमध्ये कसलीही चिरफाड करण्यात आली नाही. रुग्णाबरोबर गप्पा मारत ही शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवसापासून रुग्णाने चालणे-फिरण्यास सुरुवात केली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची सातारा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
दोन दिवसाच्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया...
कराडचे डॉ. विजयसिंह पाटील यांनी हृदय रोगावरील उपचारामध्ये रुग्णांसाठी आपल्या कौशल्याने नवा आशेचा किरण निर्माण केला आहे. हृदयाच्या अनेक गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया त्यांनी केल्याने पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा लौकिक निर्माण झाला आहे. हृदयशस्त्रक्रियेतील आव्हाने व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात डॉ. विजयसिंह पाटील हे निष्णात आहेत. काही वर्षापूर्वी दोन दिवसाच्या बालकाची हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी केली. या बालकास जन्मताच धाप लागण्याचा त्रास होता. त्याचे निदान करून लगेचच शस्त्रक्रिया करण्यात आली. आज ते बालक सात वर्षाचे असून त्यास कोणत्याही प्रकारचा हृदया संबंधीत त्रास नाही. या यशस्वी शस्त्रक्रियेबाबत डॉ. विजयसिंह पाटील यांचा अमेरिकेत सन्मान झाला. हृदय शस्त्रक्रियेमधील अद्ययावत तंत्रज्ञान संजीवन मेडिकल सेंटरमध्ये उपलब्ध झाल्याने पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील हृदयरुग्णांची चांगली सोय डॉ. विजयसिंह पाटील यांच्या प्रयत्नाने झाली आहे.
याप्रसंगी बोलताना संजीवन मेडिकल सेंटरचे चेअरमन डॉ. राजाराम पाटील यांनी सांगितले की जागतिक दर्जाची इनफेक्शन कंट्रोल प्रणाली अद्ययावत आयसीयू तसेच तज्ज डॉक्टर व कुशल पॅरामेडिकल स्टाफ टिम या सेंटरमध्ये उपलब्ध असल्यानेच अशा प्रकारची अवघड शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. संजीवन मेडिकल सेंटरमध्ये कॅशलेस गोरगरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF), माफक दरातील पॅकेजेस्, मल्टीस्पेशालिटी डॉक्टर्स पूर्णवेळ उपलब्ध आहेत. गरजू रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
राजू सनदी कराड
KARAD TODAY NEWS



Comments
Post a Comment