कराड अर्बन बँकेने व्यवसायाचा पाच हजार कोटींचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला;डॉ. सुभाष एरम...

 


कराड अर्बन बँकेने व्यवसायाचा पाच हजार कोटींचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला;डॉ. सुभाष एरम...

कराड दि.2-गतवर्षाच्या तुलनेत व्यवयात रु.४३५ कोटींची घसघशीत वाढ नोंदवत बँकेचा मार्च २०२४ अखेरचा व्यवसाय रु.५१८६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि त्याचबरोबर बँकेने कामगिरीत गुणात्मकता टिकवत नक्त एन.पी.ए. 'शून्य' टक्के राखण्यात यश मिळवले आहे. बँकेच्या शतकोत्तर वाटचालीत या दोन ऐतिहासिक घटना एकाच आर्थिक वर्षात घडल्या असून आणखी एका सुवर्णपानाची नोंद बँकेच्या इतिहासात झाली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली.

डॉ. सुभाष एरम यावेळी म्हणाले, गत आर्थिक वर्षात वसुली प्रक्रियेवर भर देऊन नक्त एन.पी.ए. चे प्रमाण तीन टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात यश संपादन केले होते. वसुली प्रक्रिया तशीच गतिमान ठेवून नेट एन.पी.ए.चे प्रमाण शून्य टक्के राखणे आणि रु.५००० कोटींचा व्यवसाय साध्य करण्याचे ध्येय वर्षाच्या सुरुवातीसच निर्धारित केले होते. व्यवसाय वाढ व वसुलीमध्ये सातत्य या दोनही आघाड्यांवर यश मिळविण्यासाठी सेवकांनीदेखील अत्यंत सूक्ष्मस्तरावर नेटके नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी केली, याचमुळे हे दुहेरी यश एकाच आर्थिक वर्षात साध्य करता आले. मार्च २०२४ अखेरच्या सांपत्तिक स्थितीचा विचार करता, ठेवी रु.३२६२ कोटी तर कर्जे रु.१९२४ कोटींपर्यंत पोहोचली असून एकूण व्यवसाय रु.५१८६ कोटी झाला आहे. बँकेला करपूर्व ढोबळ नफा रु.५५ कोटी तर कर व तरतुदीनंतर निव्वळ नफा रु.२४ कोटी २१ लाख इतका झाला आहे आणि निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण शून्य टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच उणे स्तरावर नेण्यात मिळालेले यश बँकेची आर्थिक सक्षमता व भक्कमपणा विस्तारत असल्याचे द्योतक आहे.

रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेनुसार विलीनीकृत अजिंक्यतारा बँकेच्या १० शाखांचे रिलोकेशन करण्यात आले. त्यामुळे बारामती, सोलापूर, लोणंद, रत्नागिरी, पुसेसावळी, पलूस, जयसिंगपूर, नागाळा पार्क कोल्हापूर, तळमावले, नन्हे (पुणे) या नवीन ठिकाणी बँक ग्राहकांच्या सेवेत रुजू झाली. केवळ सहा महिन्यांच्या कार्यकाळात या १० शाखांनी रु.१०० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच, रिझर्व्ह बँकेने नव्या पाच (वाई, बार्शी, सांगोला, पंढरपूर व एम.आय.डी.सी. सातारा) शाखांना मान्यता दिली आहे. लवकरच त्या शाखा ग्राहकसेवेत रुजू होतील. महाराष्ट्रातील तालुका पातळीवर स्थापन झालेली आणि रु.५००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार करणारी कराड अर्बन बँक ही एकमेव सहकारी बँक आहे. पूर्णपणे व्यावसायिक व्यवस्थापनाचा अंगीकार बँकेने केल्यामुळेच ही प्रगती साध्य करणे शक्य झाले असे प्रतिपादन ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांनी केले.

बँकेच्या स्वभांडवलाचा पाया दिवसेंदिवस मजबूत व विस्तृत होत असून चालू वर्षात भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) १६.१६% राखून आपली सक्षमता आणि सुदृढता कायम राखली आहे. बँकेस एकूण रू.५५ कोटी इतका ढोबळ नफा तर सर्व कर व तरतुदी वजा जाता रू. २४.२१ कोटी इतका निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या २६ शाखांना रु.१ कोटींपेक्षा अधिक नफा झाला असून यामध्ये सर्वाधिक नफा मिळालेल्या शाखेने रु.६ कोटींचा उच्चांकी टप्पा ओलांडला आहे. तसेच, २४ शाखांनी एन.पी.ए.चे प्रमाण 'शून्य' राखण्यात यश मिळवले आहे. अशी माहिती बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी यांनी दिली. 

गेल्या दोन वर्षांपासून वसुलीबरोबरच व्यवसायवाढीचे उद्दिष्ट गाठणे आव्हानात्मक होते. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात सेवकांना दिलेली उद्दिष्टे त्यांनी नियोजनानुसार पूर्ण केली. अग्रक्रम क्षेत्रासाठीचे कर्जपुरवण्याचे प्रमाणदेखील पूर्ण झाले असून रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकष व प्रमाणकांची पूर्तता बँकेने केली आहे. वाटचालीसाठी आम्ही नेमके ध्येय ठरवलेले होतेच, त्यास प्रयत्नांची गती आणि सेवकांची साथ उत्तम मिळाली आणि आज बँकेच्या इतिहासातील रु.५००० कोटींच्या व्यवसायाच्या सुवर्णक्षणांचे आपण सर्वजण साक्षीदार झालो आहोत. भविष्यकालीन वाटचालीतदेखील शून्य टक्के एन.पी.ए. कायम राखणे, व्यवसावाढीत सातत्य ठेवत वाटचाल आणि बँकेचा महाराष्ट्रभर विस्तार करणे हेच आमचे प्रमुख ध्येय राहील. बँकिंग व्यवसायाबरोबरच बँकेने समाजाभिमुख कार्य स्थापनेपासून केले आहे. सामाजिक ऋणात राहण्यासाठी हे कार्यदेखील भविष्यकाळात अधिक विस्तारत जाईल असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी सांगितले.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राजू सनदी कराड

Karad Today News 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक