कराडच्या कसाबवाड्यात पोलिसांचा छापा; सहा जणांना घेतले ताब्यात...
कराडच्या कसाबवाड्यात पोलिसांचा छापा; सहा जणांना घेतले ताब्यात...
कराड दि.29-कराड शहरातील गुरूवार पेठ भाजी मंडई, कसाबवाडा व मुजावर कॉलनी येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या पथकाने आज सकाळी छापा टाकला. यामध्ये कत्तलीसाठी बांधून ठेवलेली 40 जनावरे आढळून आली. तसेच काही मांस कातडेसह आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले असून वाहतुकीकरीता वापरत असलेली तीन वाहने ही जप्त केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलीस हवालदार प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी यांना शहानिशा करणेकरीता भाजी मंडई, कसाबवाडा येथे पाठविले. त्याठिकाणी काही जणांनी गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्यासाठी बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेली आढळून आले. याशिवाय मांस ही कातडेसह आढळून आले.
दरम्यान मुजावर कॉलनी येथे देखील 4 गोवंश जातीच्या गाई कत्तलीसाठी बांधून ठेवल्याच्या आढळून आल्या. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक अझरूद्दीन शेख, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल माने, आर.सी.पी. पथक यांचे सहाय्याने तात्काळ गोवंशाची सुटका करून त्यांची रवानगी गो-शाळेत करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी सहाजणांना अटक करून त्यांच्याकडून वाहतुकीकरीता वापरत असलेली तीन वाहने जप्त केली आहेत.

Comments
Post a Comment