गळीत हंगामाची उत्साहात सांगता;१३ लाख ५० हजार मे. टन ऊस गाळप...
कृष्णा कारखान्याचे १३ लाख ५० हजार मे. टन ऊस गाळप...
गळीत हंगामाची उत्साहात सांगता; १५ लाख २० हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन...
शिवनगर, दि .30: येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२३-२४ च्या गळीत हंगामात १३७ दिवसात १३ लाख ५० हजार ६५२ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. तसेच १५ लाख २० हजार ७२० क्विंटल साखर पोती उत्पादित केली असल्याचे प्रतिपादन, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी केले. कृष्णा कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी संचालक धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाजीराव निकम, अविनाश खरात, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, प्र. कार्यकारी संचालक बालाजी पबसेटवार, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, टेक्निकल को-ऑर्डीनेटर एस. डी. कुलकर्णी, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्हाईस चेअरमन श्री. जगताप पुढे म्हणाले, सर्वांच्या प्रयत्नाने यावर्षीचे उद्दिष्ट कारखान्याने पूर्ण केले आहे. ऊसतोड वाहतूकदारांना कारखाना सर्वोतोपरी सहकार्य करणार असून, त्यांना साखर संघाने जाहीर केलेली वाढ देणार आहोत. चेअरमन डॉ. सुरेशबाबांचा कारखान्याला राज्यात सर्वोत्तम संस्था बनविण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने कारखान्याची वाटचाल सुरू आहे. येणारा गळीत हंगाम लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे म्हणाले, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ, शेतकरी सभासद, तोडणी वाहतूकदार, कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने हा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. येणारा गळीत हंगामही यशस्वीपणे पार पाडून कृष्णा कारखान्याचे नाव अधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करूया.
प्रारंभी बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनस्वी पाटील यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी ऊसतोडणी वाहतूकदार, शेती व ऊसविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकरी सभासद, ऊसतोडणी वाहतूकदार, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment