श्री पावणाईदेवी असवलेवाडी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ५१ हजारांची मदत...
श्री पावणाईदेवी असवलेवाडी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ५१ हजारांची मदत...
गांधी टेकडीच्या विद्यालयाशी जोडलेली नाळ अतूट, नवीन शैक्षणिक वर्षात गरीब - गरजू विद्यार्थ्यांना घेणार दत्तक...
कराड दि.19-दुर्गम डोंगराळ भागात ज्ञानदानाची सेवा बजावत असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या गांधीटेकडी (ता.पाटण) येथील ठक्करबाप्पा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयासह त्यांच्याच दिवशी बुद्रुक येथील भागशाळेला सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर श्री पावणाई देवी असवलेवाडी चॅरिटेबल ट्रस्टने आवश्यक मदतीचे पाठबळ कायम ठेवले आहे. नुकत्याच तेथे झालेल्या कार्यक्रमात ट्रस्टने विद्यालयाला ५१ हजार रुपयांची मदत सुपूर्द तर केलीच शिवाय नवीन शैक्षणिक वर्षापासुन विद्यालयातील गरीब - गरजू विध्यार्थी दत्तक घेणार असल्याचेही अध्यक्ष भिमराव असवले यांनी ट्रस्टच्या वतीने जाहीर केले.
वाल्मीक पठारावरील श्री पावणाईदेवी असवलेवाडी चॅरिटेबल ट्रस्टचे ठक्करबाप्पा विद्यालय तसेच दिवशी बुद्रुक भाग शाळेशी जोडलेले नाते दृढ आणि अतूट आहे. माजी विद्यार्थ्यांची आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता आणि प्रेमच यामागे आहे. त्याकाळी डोंगरातून पायपीट करत शिक्षण घेतलेल्या आणि सध्या विविध क्षेत्रात योगदान देत असलेल्या वाल्मीक पठारावरील माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या या ट्रस्टमार्फत अनेक विधायक उपक्रम राबवले जातात. ज्या परिस्थितीतून आपण पुढे आलो ती परिस्थिती नव्या पिढीच्या वाट्याला येवू नये, त्यांच्या प्रगतीचा मार्ग सुकर व्हावा यासाठी ट्रस्टची नेहमी धडपड सुरू असते. विविध प्रसंगातून त्याचे प्रत्यंतर येते,नुकतेच ते आले.गांधीटेकडी येथे ट्रस्टचे अध्यक्ष भिमराव असवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दहावी - बारावी विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन कार्यक्रमात ट्रस्टतर्फे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ५१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश विद्याल्याकडे सुपूर्द करण्यात आला.
नवीन शैक्षणिक वर्षापासुन विद्यालयातील गरीब - गरजू विध्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेणार असल्याचेही अध्यक्ष भिमराव असवले यांनी ट्रस्टच्या वतीने जाहीर केले. प्रा.डॉ.आर. ए कुंभार, रयतचे जनरल बॉडी सदस्य जयवंतराव पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोकराव पाटील, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ए . ए मुलाणी, आदर्श सरपंच रवींद्र माने,ट्रस्टचे उपाध्यक्ष मारुती असवले, खजिनदार लक्ष्मण कदम, विश्वस्त सुरेश असवले, माजी सरपंच रामचंद्र असवले, सदस्य शंकर असवले आदींसह विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ट्रस्टचे अध्यक्ष भिमराव असवले म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चिती, प्रचंड मेहनत व वेळेचे नियोजन हवे, आवडीचे क्षेत्र तुम्ही निवडले तर यश निश्चित आहे.एकवेळ गमावलेला पैसा परत कमावता येईल परंतु गमावलेली वेळ परत येत नाही, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करा. संगणक, मोबाईल उपयोगी असले तरी त्याचा दुरुपयोग टाळायला पाहिजे.
प्राचार्य जे. व्ही जाधव यांनी प्रास्ताविक केले.पी.एल पाटील यांनी आभार मानले.प्रा.सुनील कापसे यांनी सूत्रसंचालन केले.






Comments
Post a Comment