कराडच्या तीन सराईत गुन्हेगारावर मोक्कांतर्गत कारवाई...
कराड, दि. 29 (प्रतिनिधी) - कराड शहर व परिसरात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे असलेल्या ओगलेवाडी परिसरातील सुर्यवंशी टोळीच्या म्होरक्यासह तिघांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख सोमा उर्फ सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी (वय 33), रविराज शिवाजी पळसे (वय 27), आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी (वय 19) तिघेही रा. हजारमाची/ओगलेवाडी, ता. कराड अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या तीन सराईत गुन्हेगारावर कराड शहर व परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण करून जबर मारहाण, जबरी चोरी, जबर मारहाण, विनयभंग, खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे, शिवीगाळ करून दमदाटी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा प्रकारचे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करून सराईत गुन्हेगार टोळीची दहशत निर्माण करून आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ओगलेवाडी परिसरातील सोमा सुर्यवंशी, रविराज पळसे, आर्यन सुर्यवंशी यांनी एकास दुर्गा देवीची वर्गणी दिली नाही, म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने व बिअरच्या बाटलीने वार केले होते. याबाबत कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद होता. या तिघांनी दहशत निर्माण करून आपल्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते.
कराडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी सुर्यवंशी टोळीविरूद्ध गुन्ह्यांची माहिती गोळा करून तिघांही विरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करीता पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीषक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. त्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सुर्यवंशी टोळी विरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचे व कागदपत्राचे अवलोकन करून मोक्का प्रस्तावाची पडताळणी केली. तसेच सदर गुन्ह्यास मोक्का कायद्यान्वये कलम वाढ करण्याबाबतची परवानगी देऊन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपाअधीक्षक अमोल ठाकूर यांच्याकडे देण्यात आला.
मोक्का प्रस्ताव मंजुरीकरीता पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली कराड पोलीस उपाअधीक्षक अमोल ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, कराड शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, पोउनि पतंग पाटील, संजय देवकुळे, पोलीस हवालदार अमित सपकाळ, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी मोक्का कारवाईत सहभाग घेतला.
दीड वर्षात 112 जणांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई
सातारा जिल्ह्यात विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्यां विरोधात नोव्हेंबर 2022 पासून नऊ मोक्का प्रस्तावांमध्ये 112 जणांविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तर 58 जणांवर तडीपारीसारखी व एकास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसेच भविष्यातही जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरूद्ध मोक्का, हद्दपारी, एमपीडीए अशा प्रकारच्या कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.
कराड टुडे न्यूज - राजू सनदी, कराड
KARAD TODAY NEWS - Raju Sanadi Karad

Comments
Post a Comment