कराडात साजरा होणारा विजय दिवस समारोह यावर्षी नव्या रूपात... दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन....
कराडात साजरा होणारा विजय दिवस समारोह यावर्षी नव्या रूपात... दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन....
कराड दि. 5 (प्रतिनिधी) प्रतिवर्षाप्रमाणे याही यावर्षी कराडात दोन दिवस विविध कार्यक्रमाने नव्या रूपाने विजय दिवस समारोह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती या समारोहाचे संस्थापक निवृत्त कर्नल संभाजी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
विजय दिवस समारोह समितीच्या वतीने देण्यात आलेल्या या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, भारतीय सैन्य दलाच्या बांगला मुक्तिसंग्रामातील दैदीप्यमान विजया प्रित्यर्थ, कराड येथे १९९८ पासून नि.कर्नल संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षी दि. १४, १५, १६, डिसेंबर रोजी विजय दिवस समारोहाचे मोठ्या उत्स्फूर्त वातावरणात आयोजन केले जाते.
सन २०२२ हे वर्ष विजय दिवस समारोहाचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. सन २०२३ पासून या समारोहाचे उपक्रमामध्ये काही मूलभूत बदल करून या वर्षीपासून समारोहाचे वतीने विद्यार्थी, युवा आणि लोकसहभागातून अनेक विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे समारोहाचे संस्थापक अध्यक्ष कर्नल संभाजी पाटील यांनी सांगितले. प्रतिवर्षी होणारा विजय दिवस समारोह, कराड आणि परिसराची सांस्कृतिक ओळख व मानबिंदू बनला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय सैन्य दल, स्थानिक प्रशासन आणि लोकसहभागाने हा विजय दिवस जनमानसात मोठे स्थान निर्माण करून आहे.
सन २०२३ पासून या उपक्रमामध्ये जीवनगौरव यशवंत पुरस्कार, वीर माता, वीर पत्नी, आदर्श माता, आदर्श विद्यार्थी, कराड दौड, सैनिक संमेलन आदि बरोबरच अनेक सांस्कृतिक व विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलाची कवाडे खुली करणारे शैक्षणिक उपक्रम सुरुवात करून देशोन्नती प्रक्रियेमध्ये भरीव योगदान देण्याचा मानस विजय दिवस समारंभाचे बैठकीमध्ये अध्यक्ष कर्नल संभाजी पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी समारोहाचे उपाध्यक्ष अरुण जाधव, अॅड. संभाजीराव मोहिते, चंद्रकांत जाधव, विनायक विभुते, विलासराव जाधव, अॅड. परवेझ सुतार, प्रा. बी. एस. खोत, सतीश बेडके, अपिने सर व संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान विजय दिवस समारोह समितीने प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिलेल्या माहितीनुसार विजय दिवस समारोह छत्रपती शिवाजी स्टेडियम वर साजरा होणार की नाही याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. या विजय दिवस समारोह निमित्त आयोजित कार्यक्रम स्व. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी छत्रपती शिवाजी स्टेडियम वर विजय दिवस समारंभाचे कोणतेही कार्यक्रम होणार नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. मात्र याबाबत विजय दिवस समारोह समितीच्या वतीने कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
गेली 25 वर्ष विजय दिवस समारोह समितीच्या वतीने कराड शहरात प्रतिवर्षी तीन ते चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारतीय सैन्य दलातील जवानांच्या थरारक प्रात्यक्षिकाबरोबरच हवाई दल, विविध विभागातील सैन्य दलाचे जवान व सैन्य दलातील शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन कराडकरांचे आकर्षण होते. हा आवाढव्य विजय दिवस साजरा करण्यासाठी संयोजकांना मोठी कसरत करावी लागत होती. यासाठी लाखो रुपयांचा खर्चही होत होता. तरीही निवृत्त कर्नल संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरात गेली 25 वर्ष अविरहीत हा विजय दिवस समारोह साजरा झाला.मात्र यापुढे हा विजय दिवस समारोह पूर्वीप्रमाणे साजरा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Post a Comment