कराड शहरातील 19 टपऱ्यांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई...

 

कराडमधील 19 टपऱ्यांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई...

कराड, दि.28: जिल्हा रुग्णालयांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्यावतीने (एनटीपीसी) ‘कोटपा’ कायद्यानुसार कराड येथील १९ टपऱ्यांवर कारवाई करुन ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई व व्यापार वाणिज्य उत्पादन आणि नियमन) कायदा २००३ अर्थात ‘कोटपा’ कायद्याच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांची जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे.

या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी, तंबाखूची जाहिरात आदी निर्बंध आहेत. त्याअनुषंगाने तंबाखू विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज कर्पे यांनी दिली आहे.

काय आहे ‘कोटपा’ कायदा...

भारत सरकारने २००३ मध्ये सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा तयार केला आहे. या कायद्यातील काही महत्वाची कलमे खाली दिली आहेत.

कलम ४– सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी – निष्क्रिय धूम्रपानापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमान स्थळ, सर्व सरकारी व खाजगी कार्यालये, सर्व कामाची ठिकाणे, शाळा, न्यायालये, रुग्णालये आदींचा यात समावेश होतो. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यास २०० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.

कलम ५ – तंबाखूची जाहिरात, प्रसार आणि प्रायोजकत्व यावर बंदी - तंबाखूजन्य पदार्थांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरात कुठल्याही माध्यमातून असो त्यावर बंदी आणणे तसेच कुठल्याही तंबाखू कंपनीने एखाद्या सांस्कृतिक, सामाजिक आदी कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारण्यास बंदी आहे. या कलमाचे उल्लंघन झाल्यास राष्ट्रीय संपर्क केंद्राला १८००११०४५६ या क्रमांकावर मोफत संपर्क करता येईल. या कलमाच्या उल्लंघनाच्या पहिल्या गुन्ह्यास १ वर्षापर्यंत शिक्षा व १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. दुसरा गुन्हा असेल तर ५ वर्षेपर्यंत कारावास व ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.

कलम ६ अ–१८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे किंवा त्यांच्या कडून विक्री करून घेण्यावर बंदी असून त्यासाठी २०० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.

कलम ६ ब– कुठल्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असून या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यास २०० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

कलम ७–तंबाखू उत्पादनावर मजकूर व चित्र स्वरुपात धोक्याच्या सूचना देणे बंधनकारक आहे. या कलमाचे उल्लंघनाच्या पहिल्या गुन्ह्यास २ वर्षापर्यंत शिक्षा व ५ हजार रुपयापर्यंत दंड तर दुसऱ्या गुन्ह्यास ५ वर्षे कारावास व १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे.

राजू सनदी कराड 

कराडात राम जन्मभूमी मंगल अक्षता कलश यात्रा...

https://youtu.be/5Nq1RZFxGog?si=fGmtgqjC2eO-MHJF


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक