ढासळलेला चेंबर बनतोय धोकादायक; नगरपरिषदेकडून दुरुस्तीस प्रारंभ...
ढासळलेला चेंबर बनतोय धोकादायक; नगरपरिषदेकडून दखल...
कराड दि. 28-येथील सोमवार पेठेत शिवाजी क्रीडा मंडळाच्या प्रवेशद्वारातच असलेला ड्रेनेजचा मोठा चेंबर ढासळल्याने मैदानावर तो धोकादायक बनला आहे. चेंबर पडून दोन दिवस झाले असून नगरपरिषदने ढासळलेल्या चेंबरची तातडीने दुरुस्ती सुरू केली आहे. त्या परिसरातील नागरिकांनी चेंबर दुरुस्त करावा अशी मागणी केली होती. या ठिकाणी अनेक मुले या मैदानावर खेळत असतात त्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते.
शिवाजी क्रीडा मंडळाच्या गेट समोरच मैदानावर सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचा हा चेंबर आहे. जमिनीपासून साधारण पंचवीस फुटावून अधिक खोल असणारा हा चेंबर आहे. नगरपरिषद, मंडई परिसर, कन्या शाळा अशा मोठ्या परिसरातून या ठिकाणी चेंबर मध्ये असणाऱ्या मोठ्या सिमेंटच्या पाईप मधून सांडपाणी वाहत असते. या ठिकाणी विटांचा बांधकाम असलेला चौकोनी चेंबर दोन दिवसापूर्वी अचानक ढासळला.
दरम्यान ढासळलेल्या चेंबरमुळे परिसरात मोठा खड्डा पडला असून मैदानावर संबंधित जागा धोकादायक बनली आहे. नगर परिषदेच्या संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करण्यास प्रारंभ केला आहे. या मैदानावर सतत मुले खेळत असतात त्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते याची तातडीने दखल नगरपरिषदेने घेऊन व चेंबरची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे.

Comments
Post a Comment