कराडात 'आनंदाचा शिधा' वितरित करण्यास प्रारंभ...
कराड दि.6 (प्रतिनिधी) कराड शहरात सुमारे 9 हजार 828 कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलोची रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा जिन्नस प्रति शिधापत्रिकास ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या दराने वितरीत करण्यात येत आहे.
राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळेल याची दक्षता घ्यावी अशा सूचना कराडचे प्रांताधिकारी अतुल मेत्रे, तहसीलदार विजय पवार यांनी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. आनंदाचा शिधा व इतर धान्य योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी जे शिधापत्रिका धारक ऑनलाइन नाहीत त्यांना तत्काळ ऑनलाइन करून घ्यावे. दिवाळीत राज्यातल्या नागरिकांना १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला जात आहे. राज्यातील सर्व अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.
कराड शहरासह तालुक्यात सुमारे 75 हजार 575 आनंदाचा शिधा असणारे संच कराड तालुका पुरवठा विभागाला प्राप्त झाले असून त्याचे वितरण शहरासह तालुक्यात सुरू करण्यात आल्याची माहिती कराड तालुका पुरवठा अधिकारी महादेव अष्टेकर यांनी दिली.

Comments
Post a Comment