प्रा. डॉ. माणिक बनकर यांना पीएच. डी. पदवी प्रदान...
प्रा. डॉ. माणिक बनकर यांना पीएच. डी. पदवी प्रदान...
कराड दि.1-प्रा. डॉ. माणिक नामदेव बनकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून मराठी विषयातील सुरेश शिंगटे यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास" या विषयावर सादर केलेल्या प्रबंधास विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी.- डॉक्टरेट विद्यावाचस्पती ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे.
या परीक्षेसाठी अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख डॉ. दासू वैद्य, बाहय परीक्षक म्हणून राणी चेन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय कांबळे आणि मार्गदर्शक म्हणून अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टीचे मराठी विभाग प्रमुख डॉ. राजाराम सोनटक्के हे मान्यवर होते.
या शिक्षण क्षेत्रातील दैदिप्यमान यशाबद्दल प्रा. डॉ. माणिक बनकर यांचे प्रा. डॉ. रघुनाथ केंगार कराड, प्रा. डॉ. प्रकाश दुकळे कोल्हापूर, कराड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शंकर खंदारे व कार्यालयीन पदाधिकारी, कर्मचारी संघटना, बहुसंख्य हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.
प्रा. डॉ. माणिक बनकर हे निमगाव केतकी ता. इंदापूर जि. पुणे. येथील मूळ रहिवाशी असुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ITI चे शिक्षण घेऊन कराड नगरपरिषदेत प्लंबर म्हणून नोकरीत असताना अत्यंत चिकाटीने मराठी विषयामध्ये M.A. SET Ph.D. पर्यंत शिक्षण घेऊन ज्ञानाच्या क्षेत्रात शेप घेतली आहे. या यशामध्ये त्यांचे कुटुंब पत्नी सौ.शोभा, मुलगा रोहित, कन्या योगिता, सूनबाई गायत्री, जावई सुरज व नात अद्विता यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
प्रा. डॉ. माणिक बनकर यांनी प्लंबर म्हणून हातात पाना घेत असतानाच लेखणीही घेऊन साहित्यक्षेत्रात दमदार वाटचाल केली. त्यांच्या वाटेवरच्या कविता व दयना या दोन साहित्यकृती प्रसिध्द झाल्या आहेत. बनकर यांच्या घराण्यात शिक्षणाचा कोणताही वारसा नसताना साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या गगनभरारीमुळे त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment