स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय हाॅल नगरपरिषदेच्या ताब्यात; निविदा काढून नागरिकांसाठी वापरात आणणार...
स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय हाॅल नगरपरिषदेच्या ताब्यात; निविदा काढून नागरिकांसाठी वापरात आणणार...
कराड दि.27- कोविड सेंटरसाठी वापरण्यात आलेला यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल संबंधित विभागाकडून अखेर तीन वर्षानंतर नगरपरिषदेकडे सुपूर्द झाला आहे. त्यामूळे नगरपरिषदेने हॉलची स्वच्छता व दुरुस्ती करून ते वापरात आणण्याची तयारी सूरू केली आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण नगरपरिषदेत आल्यानंतर नगर अभियंता आर डी गायकवाड यांनी त्यांच्याशी या विषयावर चर्चा केल्यानंतर व संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर हा हॉल प्रांताधिकारी यांनी नगर परिषदेच्या ताब्यात दिला असून आता हा प्रशस्त हॉल नागरिकांना वापरासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती नगर अभियंता आर डी गायकवाड यांनी दिली.
सदर हॉल गेली तीन वर्षहून अधिक काळ कोविड सेंटरसाठी वापरण्यात आला होता. या काळात नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. सप्टेंबर 2020 मध्ये या हॉलचे रूपांतर कोविड सेंटर मध्ये केल्यानंतर पहिल्या लाटेत काही काळ हाॅलचा वापर झाला. मात्र दुसऱ्या लाटेत या हॉलचे रूपांतर संपूर्णपणे कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. मात्र तरीही याचा वापर झाला नाही. यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये वाया गेले होते.
कोरोना काळात नागरिकांवर उपचार करण्यासाठी शहरातील खाजगी व सरकारी हॉस्पिटल अपुरी पडू लागल्यानंतर या बहुउद्देशीय हॉलचे कोविड सेंटर मध्ये रूपांतर केले होते. सप्टेंबर 2021 नंतर शासनाने कोरोना संसर्ग वाढेल म्हणून या बहुउद्देशीय हॉलमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आला. मात्र त्याचा वापर झालाच नाही. या कामासाठी शासनाने एक कोटी होणे अधिक रक्कम खर्च केली. त्यानंतर जानेवारी 2022 ते आजअखेर या कोविड सेंटर कडे ना नगरपरिषद ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीही फिरकले नव्हते.त्यामूळे या कोविड सेंटरची प्रचंड दुरावस्था झाली आहे.
कोरोना काळ संपल्याने अनेक ठिकाणची कोविड सेंटर बंद करण्यात आली. मात्र कराडात भव्य असे असणारे स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय हॉलमधील सेंटर अद्यापही कुलूप बंद अवस्थेत होते. त्यामूळे नगरपालिकेचे लाखो रुपयाचे उत्पन्न बुडाले. याशिवाय या वास्तूची प्रचंड दुरावस्था झाली. सदरची वास्तू पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमासाठी सुरू करण्यासाठी नगरपरिषदेने प्रयत्न करुन जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत पाठपूरावा सूरू ठेवला होता.
तत्कालीन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनीही वेळोवेळी याचा पाठपुरावा केला होता. नगरपरिषदेत नव्याने रुजू झालेल्या नगर अभियंता आर डी गायकवाड यांनीही याबाबत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र तरीही याबाबत हालचाल होत नव्हती. दरम्यान गणेशोत्सव काळात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण नगरपरिषदेत कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर त्यांना या विषयी नगर अभियंता गायकवाड यांनी माहिती दिल्यानंतर आ. चव्हाण यांनी संबंधित प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी नुकतेच या हॉलचा ताबा पुन्हा नगर परिषदेकडे दिला आहे.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातुन मिळालेल्या निधीतुन भव्य हाॅलची उभारणी झाली मात्र त्याचा म्हणावा असा वापर झाला नाही. त्यानंतर नगरपरिषदेने संबंधित हॉल निविदा काढून चालविण्यास दिला होता.
दरम्यान सदर हॉलची नगरपरिषद प्रशासनाने नुकतीच पाहणी केली असून हॉलमधील सर्व यंत्रणा साहित्य काढण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. लवकरच हा हॉल सुरू करण्याबाबत नगरपरिषद तयारी करत असून या हॉल पुन्हा चालवण्यास देण्यात येणार असून त्याबाबत लवकरात लवकर निविदा काढून ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती नगर अभियंता आर डी गायकवाड यांनी दिली.

Comments
Post a Comment