विद्यार्थ्यांनी नवनिर्मिती, सर्जनशीलतेचा ध्यास घ्यावा : डॉ. वेदप्रकाश मिश्रा...
विद्यार्थ्यांनी नवनिर्मिती, सर्जनशीलतेचा ध्यास घ्यावा : डॉ. वेदप्रकाश मिश्रा...
कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित ‘कृषी विज्ञान विधी’ राष्ट्रीय परिषदेचा समारोप...
कराड दि.9: सर्जनशीलतेवर कुणाचाही एकाधिकार नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये दडलेली जिज्ञासूवृत्तीच तुम्हाला नवनिर्मितीकडे घेऊन जात असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी नवनिर्मिती व सर्जनशीलतेचा ध्यास घ्यावा, असे आवाहन कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
कृष्णा विश्व विद्यापीठ, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पंजाब येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रोपर यांच्या सहकार्यातून कृष्णा विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय ‘कृषी विज्ञान विधी’ राष्ट्रीय परिषदेचा समारोप उत्साहात झाला.
व्यासपीठावर पुणे येथील जी. एच. रायसोनी इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. डी. खराडकर, कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील, डॉ. जसवीर सिंग, कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, इनोव्हेशन ॲन्ड इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. डी. के. अगरवाल, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, आयआयटी रोपरचे चिफ इनोव्हेशन ऑफिसर मुकेश केस्तवाल, कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, डॉ. जयंत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना डॉ. मिश्रा म्हणाले, प्रत्येकाकडे कल्पनाशक्ती असते. पण त्याचा प्रत्येकजण पुरेसा वापर करत नसल्याने आपण स्पर्धेत मार्गे राहतो. आपल्या कल्पनांना सत्यात उतरविण्यासाठी अथक परिश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्न महत्वाचे आहेत. प्रामाणिकपणे, सचोटीने ‘का’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास आणि आपल्यातील जिज्ञासू वृत्ती मरु न दिल्यास नवनिर्मितीचा शोध घेणे सहजशक्य आहे.
तंत्रज्ञानाचा अवलंब करत अनेक ई-कॉमर्स कंपन्या जगभर मोठा व्यवसाय करत आहेत. त्यातून रोजगार निर्मिती वाढत आहे. शेतीक्षेत्राच्या विकासासाठी कृषी व इंजिनियरिंग या दोन्ही ज्ञानशाखांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. आर. डी. खराडकर यांनी केले.
भारताच्या कृषी धोरणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष असून, कृषीक्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढविणे शक्य असल्याचे मत कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केले.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दोनदिवसीय परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जल व्यवस्थापन व आधुनिक सिंचन तंत्र या विषयांच्या अनुषंगाने मांडणी केली. तसेच विविध प्रतिनिधींनी सादर केलेल्या प्रकल्पांना समारोप सत्रात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. डी. के. अगरवाल यांनी स्वागत व प्रास्तविक केले. डॉ. स्नेहल मसूरकर व तृप्ती भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रणय अभंग यांनी आभार मानले.

Comments
Post a Comment