कृष्णा बँकेकडून सभासदांना १२ टक्के लाभांश.... बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ११५० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट....

कृष्णा बँकेकडून सभासदांना १२ टक्के लाभांश....

बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ११५० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट....

कराड, दि.25-: कृष्णा सहकारी बँकेने सभासदांच्या सहकार्यातून उत्तम आर्थिक वाटचाल केली आहे. बँकेच्या स्वनिधीत सातत्याने वाढ होत असून, बँकेची नफा क्षमताही दिवसेंदिवस वाढत आहे. या बाबी विचारात घेऊन, कृष्णा बँकेने सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला. विशेष म्हणजे सभा सुरू असतानाच अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब करत, एका क्लिकवर बँकेच्या सभासदांच्या खात्यावर तात्काळ लाभांश रक्कम जमा करण्यात आली.  

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विराज मल्टिपर्पज हॉल येथे बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष दामाजी मोरे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव, कृष्णा कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेत बोलताना चेअरमन डॉ. अतुल भोसले म्हणाले, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पांनी १९७१ साली कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. सभासदांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे व विश्वासामुळे बँकेने उत्तम प्रगती केली असून, गेली सलग ११ वर्षे बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के राहिला आहे. ३१ मार्च २०२३ अखेर बँकेने ८७६ कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला असून, बँकेकडे ५७६ कोटींच्या ठेवी आहेत; तर २९९ कोटींचे कर्जवितरण केले आहे. येत्या आर्थिक वर्षात बँकेने ११५० कोटींचे व्यवसाय उद्दिष्ट ठेवले आहे. बँकेच्या प्रगतीत सेवकांचे योगदानही महत्वपूर्ण असून, सेवकांच्या हितासाठी बँकेने पगारवाढ, बोनस यासह प्रोत्साहनपर भत्त्याच्या रुपाने चांगले आर्थिक पाठबळ उपलब्ध करुन दिले आहे. कृष्णा बँकेसह सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकारी पतसंस्था, कृष्णा महिला सहकारी पतसंस्था व वित्तपेठा अशा संस्थाचा मिळून तयार झालेल्या कृष्णा आर्थिक परिवाराने ३१ मार्च २०२३ अखेर १४९० कोटींचा व्यवसाय टप्पा पूर्ण केला असून, येत्या मार्चअखेर २००० कोटी व्यवसायपूर्तीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की गेल्या ५२ वर्षात बँकेच्या वाटचालीत अनेक चढउतार आले, पण प्रत्येक संकटावर मात करत कृष्णा बँक आज प्रगतीपथावर पोहचली आहे. बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. या सर्व नव्या गोष्टींचा अवलंब करत, कृष्णा बँक पुढे वाटचाल करत आहे. बँकेने सभासद व ग्राहकांच्या विश्वासाला पात्र राहून कार्य करत, देशपातळीवर आपली ओळख निर्माण करावी.

सभेला कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, रणजित लाड, हर्षवर्धन मोहिते, नामदेव कदम, प्रदीप थोरात, विजय जगताप, प्रकाश पाटील, गिरीश शहा, शिवाजी पाटील, संतोष पाटील, अनिल बनसोडे, नारायण शिंगाडे, श्रीमती सरिता निकम, सौ. सारिका पवार, अभिजीत दोशी, ॲड. विजय पाटील, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य गुणवंत जाधव, डॉ. राजेंद्र कुंभार, हणमंत पाटील, सुनील पाटील, प्रदीप पाटील, दिलीपरावजी पाटील, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक क्लिक अन्‌ सभासदांच्या खात्यावर एकूण ८३ लाख लाभांश वर्ग...

कृष्णा सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला. याला सभेची मंजुरी मिळताच, सभा सुरु असतानाच व्यासपीठावरुन बँकेचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले यांनी लॅपटॉपवर क्लिक केले आणि अत्याधुनिक ऑनलाईन प्रणालीद्वारे क्षणार्धात सभासदांच्या बँक खात्यावर एकूण ८३ लाख रुपये लाभांश रक्कम वर्ग झाली. सभेतच बहुतांश सभासदांनी मोबाईल उंचावून दाखवित लाभांश रक्कम मिळाल्याचा एस.एम.एस. आल्याचे जाहीर केल्याने, कृष्णा बँकेच्या या कृतीचे कौतुक सभास्थळी होत होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक