राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कराडात...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कराडात...
कराड दि.9 (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांच्याबरोबर इतर आठ जणांनी ही मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या रविवारी दुपारी एक वाजता अजित पवार प्रीतीसंगमावरील समाधीचे दर्शन घेऊन उपस्थिताना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी 'कराड टुडे'शी बोलताना दिली. माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर तसेच आ. मकरंद पाटील यांनी अजित दादांच्या दौऱ्याची तयारी केली असून जिल्ह्यात त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येणार असल्याचेही पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कराड दौऱ्यावर आले होते. त्यांनी स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन केल्यानंतर उपस्थित हजारो समर्थकांना मार्गदर्शन केले होते. पवार समर्थक आ. बाळासाहेब पाटील यांनी ऐनवेळी पवार साहेबांच्या स्वागताची तयारी केली होती. शरद पवार यांनी बंडखोरी केलेल्या अजित पवारांसह अन्य आमदारांचा चांगलाच समाचार घेतला होता. आता अजित पवार उद्या समाधीस्थळावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सायंकाळी नितीन पाटील यांच्यासह राजेश पाटील-वाठारकर, सादिक इनामदार तसेच अन्य पदाधिकारी यांनी आज प्रीतीसंगम, कृष्णा घाट परिसराची पाहणी केल्यानंतर नितीन पाटील म्हणाले, अजित दादा उद्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कराडला ते पदाधिकारी कार्यकर्त्यांना वेळ देणार आहेत. कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर ते उपस्थिताना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते कोल्हापूर कडे रवाना होणार आहेत.
दरम्यान अजित दादा उद्या कराडला येणार असल्याने कराड उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर, शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी कृष्णा घाट तसेच मेन रोड परिसराची पाहणी करून व्यावसायिक हातगाडा यांना सूचना केल्या. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने कृष्णा घाटावर अनेक विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. मात्र उद्या दुपारी एक वाजता अजित दादा यांचे कृष्णा घाटावर आगमन होणार असल्याने आज या विक्रेत्यांना पोलिसांनी उद्या या ठिकाणी कोणतेही व्यवसाय, हातगाडे न लावण्याबाबत सूचना केल्या आहेत.

Comments
Post a Comment