कराडात कोणत्याही प्रकारचा मोर्चा काढणार नाही; हिंदू मुस्लिम समाजाकडून पोलीस प्रशासनाला आश्वासन...
कराड दि. 14 (प्रतिनिधी) पुसेसावळी येथे सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्ह्यात या प्रकारानंतर विविध संघटनांकडून मोर्चे, प्रति मोर्चे काढण्याबाबत सुरू असलेल्या नियोजना नंतर पोलीस प्रशासनाने संबंधित समाज बांधवा समवेत बैठका घेऊन याबाबत चर्चा सुरू केली आहे. त्या अनुषंगाने आज कराड येथे अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर तसेच डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या उपस्थित बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत दोन्ही समाज बांधवाकडून कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढण्यात येणार नसल्याचे सांगून शांतता अबाधित राखण्याचे आश्वासन दिले.
कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या अध्यक्षतेखाली डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आम्ही शांतता प्रिय असून कराडच्या शांततेला तडा जाईल असे कोणतेही वर्तन करणार नाही किंवा मोर्चा काढणार नाही असे चर्चेदरम्यान आश्वासन दिले. तसेच समाज माध्यमाद्वारे महापुरुषांचे अवमान करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी विनायक पावसकर, चंद्रकांत जिरंगे, अजय पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान उपविभागीय कार्यालयात डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत मुस्लिम समुदाय शांतताप्रिय असून कोणत्याही प्रकारे रस्त्यावर उतरून शांतता बिघडणार नाही तसेच कसल्याही प्रकारचा मोर्चा काढण्याचे कोणतेही नियोजन नसल्याचे आश्वासन यावेळी मुस्लिम समुदायाकडून बैठकीत देण्यात आले. या बैठकीत मुस्लिम समुदायाकडून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या बैठकीला फारूक पटवेकर, अल्ताफ शिकलगार, साबीरमिया मुल्ला व समाज पदाधिकारी उपस्थित होते.
उपविभागीय कार्यालयात दोन्ही समाज बांधवां समवेत झालेल्या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर तसेच डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी पोलीस प्रशासन अशा घटनांमध्ये कठोर कारवाई करण्यासाठी सज्ज असून कोणत्याही प्रकारे कराड शहरात अशांतता खपवून घेतली जाणार नसल्याचे सुचित करून यापुढे सोशल मीडियातून वादग्रस्त वक्तव्य किंवा अन्य माहिती पसरवणाऱ्या व्यक्तीवर पोलीस प्रशासनाकडून काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाणार असल्याचे सांगितले.



.jpeg)

.jpeg)
Comments
Post a Comment