कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी पुन्हा शंकर खंदारेच....
कराडला पुन्हा मुख्याधिकारीपदी शंकर खंदारे; आठ दिवसांनी कराडला झाले हजर....
राजू सनदी कराड
कराड दि.4 (प्रतिनिधी) कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी शंकर खंदारे पुन्हा येणार येणार म्हणून गेली महिनाभर सुरू असलेल्या चर्चेला अखेर विराम मिळाला आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी शंकर खंदारे यांना रुजू होण्याचे आदेश कराडला आठ दिवसापूर्वी प्राप्त झाले होते. खंदारे अकोला नगरपरिषदेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होते. अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती झालेला अधिकारी पुन्हा मुख्याधिकारी पदावर येतो आणि तेही कराडातच याची मात्र चर्चा सुरू झाली आहे. 27 सप्टेंबर रोजी चार्ज घेण्याच्या आदेश दिल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी खंदारे यांनी कराड मुख्याधिकारी पदाचा आज चार्ज घेतला आहे.
कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी पहिल्यांदा जूनमध्ये शंकर खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी पदाचा चार्ज ही स्वीकारला. त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात म्हणजे जुलैमध्ये त्यांची पदोन्नती झाली. या पदोन्नतीनुसार त्यांची अकोला महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक झाल्याची आदेश काढण्यात आले. त्यावेळी खंदारे यांनी या पदोन्नती बाबत दिलेल्या ठिकाणी चार्ज घेण्याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केली नव्हती व कराड मुख्याधिकारी पदाचा चार्ज सोडला नव्हता. त्यातच दहा ऑगस्ट रोजी त्यांच्याकडे असणारा कराड नगरपरिषदेचा व पाटण नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा चार्ज सोडण्याबाबतचे आदेश सातारा जिल्हाधिकारी यांनी काढले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कराड व पाटण नगरपरिषदेचा चार्ज पुढील आदेश येईपर्यंत कराड मुख्याधिकारी पदाचा चार्ज फलटणचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे देण्यात देण्यात आले. त्यानुसार गायकवाड यांनीही या पदाचा कार्यभार स्वीकारत काम सुरू ठेवले होते.
गायकवाड यांच्याकडे नगरपरिषदेचा चार्ज दिल्यानंतर कराड मुख्याधिकारी पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच गेली महिन्यापासून खंदारे पुन्हा कराडच्या मुख्याधिकारी पदी रुजू होणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर नुकतेच आलेल्या आदेशानुसार ही चर्चा खरी ठरल्याचे बोलले जात आहे. दोन महिन्यापूर्वी मलकापूर कराडचा चार्ज असणाऱ्या एका अभियंत्यावर लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईची मोठी चर्चा सुरू झाली होती. या कारवाईनंतर कराड नगर परिषदेतील विविध विभागातही त्यावेळी अलर्ट जारी करण्यात आला होता.
प्रारंभी शंकर खंदारे यांची कराड मुख्याधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर खंदारे यांनी नगर परिषदेच्या जुन्या सभागृहाची आपल्या कार्यालयासाठी निवड करून सत्तर वर्षांपूर्वीपासून असलेले हे जुने सभागृह मोडीत काढले, मात्र तरीही त्यात त्यांच्या ऑफिस सुरू झाले नाही. त्यांनी नवीन इमारतीमध्ये त्यांचे ऑफिस सुरू केले. तसेच मुख्याधिकारी निवासस्थाना मध्येही बदल करण्यास सुरुवात केली. त्या अंतर्गत त्या ठिकाणीही अजूनही कामकाज सुरू आहे.
दरम्यान खंदारे यांची भाषा खडक स्वरूपाची असून त्यांनी कर्मचाऱ्यांना आपल्या कडक शब्दातून कामाप्रती सुनावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. कामे करा अन्यथा घरी घालवेन अशी धमकीची भाषा वापरत नगरपरिषद आवारात एकही कर्मचारी दिसता कामा नये असे फर्मान सोडले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. शिवाय नगरपरिषद आवारात ही खंदारे यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. खंदारे कराड मधून अकोला येथे गेल्यानंतर कराड नगर परिषदेत उपमुख्यधिकारी यांनी त्यांचीच री ओढल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.
कराड नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात सातत्य ठेवून शहरात स्वच्छतेबरोबर इतर उपक्रम राबवून कराड नगर परिषदेला सलग देशात अव्वल क्रमांक पटकावून दिला आहे. आजही हे कर्मचारी त्या तळमळीने काम करत आहेत. त्यामुळे त्यांना नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. यापूर्वीही आशा अधिकाऱ्यांनी त्यांनी वापरलेल्या भाषेचा त्यांना फटका बसल्याचेही अनेकांनी पाहिले आहे.

Comments
Post a Comment