कराडात हजारो गणेश मूर्तींचे पालिकेच्या जलकुंडात विसर्जन...
कराडात हजारो गणेश मूर्तींचे पालिकेच्या जलकुंडात विसर्जन...
राजू सनदी, कराड
कराड दि.24-(प्रतिनिधी) गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात शनिवारी घरगुती गणेशमूर्ती व गौरीचे विसर्जन कोयना कृष्णा नदी पात्रात भक्तीभावाने करण्यात आले. शहरात कराड नगरपरिषदेने ठिकठिकाणी ठेवलेल्या 19 जलकुंडात 1 हजार 800 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर सुमारे 15 ट्रॉली निर्मल्य संकलित करण्यात आले. काल विसर्जन झाल्यानंतर आज सकाळी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्राची स्वच्छता ही केली.
कराड पालिकेने कृष्णा कोयना नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची जनजागृती करत मूर्ती दान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील 19 जलकुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन केले. तसेच गणेश भक्तांनी निर्मल्य कलशात व अन्य ठिकाणी नदीपात्रात टाकलेले 15 ट्रॉली निर्माल्य संकलित करून कृष्णा घाट, कृष्णा कोयना नदी पात्राची स्वच्छता केली.
काल पाच दिवसांच्या गणेशोत्सवाची व गौरी पूजन नंतर एकत्रित विसर्जन करण्यात आले. कृष्णा घाटावर दुपारनंतर विसर्जनासाठी मोठी गर्दी गणेश भक्तांनी केली होती. यावेळी कृष्णा घाटावर कराड नगरपरिषद व एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लब, कराड शहर पोलीस स्टेशन यांच्यावतीने गणेश भक्तांचे स्वागत करण्यात येत होते. तसेच कृष्णा कोयना नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्याचे आव्हान करण्यात येत होते. जलकुंडात विसर्जन केलेल्या गणेश भक्तांचे पालिकेकडून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
दरम्यान पालिकेकडून संपूर्ण शहरात प्रत्येक घरातूनही गणेशमूर्ती विसर्जनासाठी संकलित करण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था केली होती. यालाही शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नगरपालिका कर्मचाऱ्याकडे आपल्या गणेश मूर्ती सुपूर्द केल्या.
शहर पोलीस स्टेशन कडून संपूर्ण शहरात व कृष्णा घाट परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर कराड वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यासह कृष्णा घाट व नदीपात्रात येणाऱ्या वाहनांची योग्य ठिकाणी पार्किंगची सोय करून नदीपात्रातूनच वाहने ठरवून दिलेल्या मार्गावरून मार्गस्थ केल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.
कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता ए आर पवार, आर डी भालदार, मिलिंद शिंदे, वरिष्ठ मुकादम मारुती कटरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी तर कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, दीपक जाधव व त्यांचे सहकारी यांनी विसर्जनासाठीची चोख व्यवस्था पार पाडली.





Comments
Post a Comment