स्वच्छता महाअभियानात उपमुख्याधिकाऱ्यांसह संवर्गातील विभाग प्रमुखांची दांडी...
कराडच्या स्वच्छता महाअभियानात उपमुख्याधिकाऱ्यांसह संवर्गातील विभाग प्रमुखांची दांडी...
कराड दि. 17 (प्रतिनिधी) देशभरात स्वच्छता पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषदेच्या वतीने इंडियन स्वच्छता लीग 2.0 व सफाई मित्र सुरक्षा शिबिर अंतर्गत आज कृष्णा नदीपात्रात स्वच्छता महाअभियान राबवण्यात आले. या अभियानात शहरातील सामाजिक संस्था, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असताना नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांच्यासह नगर परिषदेतील संवर्गातील विभाग प्रमुखांनी दांडी मारून उदासीनता दाखवल्याने अभियानात सर्वांनी नाराजी व्यक्त केली.
स्वच्छता पंधरवडा अभियान राबवण्यात सध्या कराड नगरपरिषद व्यस्त आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत स्वच्छता पंधरवडा जनजागृती रॅलीसह आज कृष्णा नदी पात्रात व कृष्णा घाट परिसरात स्वच्छता महाअभियान राबवण्यात आले. या महाअभियानात कराड नगरपरिषद आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांसह जलनिसारण अभियंता ए आर पवार, आरोग्य अभियंता आर डी भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, स्वच्छता अभियान समन्वयक आशिष रोकडे, वरिष्ठ मुक्काम मारुती काटरे, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, दौलतराव आहेर कॉलेज, यशवंत हायस्कूल, संत तुकाराम हायस्कूल, कन्या शाळा कराड अर्बन बँक, कॅनरा बँक, विजय दिवस समारोह समिती, एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लब, इंजिनिअर्स व आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी सहभागी झाले होते.
आज सकाळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी परिसरात या अभियानात सहभागी झालेल्या सर्वांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली व त्यानंतर स्वच्छता महाअभियानास प्रारंभ करण्यात आला. समाधी परिसर, नदीपात्रातील मोकळा भाग, कृष्णाबाई मंदिर, कृष्णा घाट या परिसरातील कचरा व झाडे झुडपे यावेळी काढण्यात आली.
कृष्णा नदीपात्रात हे स्वच्छता महाअभियान राबवत असताना व त्यातील वरील सहभाग मोठ्या प्रमाणात असताना नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांच्यासह नगरपरिषदेतील संवर्गातील विभाग प्रमुखांनी गैरहजर राहून उदासीनता दाखवल्याने या अभियानात सहभागी सर्वांनी नाराजी व्यक्त केली.



Comments
Post a Comment