बीएसएनएल टॉवरमुळे स्थानिकांचे जीवनमान उंचावेल;सारंग पाटील...
बीएसएनएल टॉवरमुळे स्थानिकांचे जीवनमान उंचावेल;सारंग पाटील...
कराड दि.8-संभाषणाची साधने दुर्गम वाड्यावस्त्यांवर पोहोचावीत यासाठी खासदार श्रीनिवास पाटील प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बीएसएनएल टॉवरमुळे स्थानिकांचे जीवनमान उंचावेल असे मत राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले.
खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील वरपेवाडी, पाणेरी, तामिणे, कारळे याठिकाणी मंजूर झालेल्या बीएसएनएल टॉवरच्या भूमिपूजन निमित्ताने स्थानिक ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सारंग पाटील म्हणाले, ग्रामीण भागाला बीएसएनएलच्या दूरध्वनी आणि मोबाईल सेवेवर अवलंबून रहावे लागते. मात्र टॉवरची संख्या कमी असल्यामुळे रेंज नसल्याचा अऩुभव बऱ्याचदा येतो. परिणामी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी संपर्क होऊ शकत नाही. दुर्गम वाड्या-वस्त्यांची तर आणखीनच बिकट परिस्थिती आहे. मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्रत्येक गावोगावी मोबाईल नेटवर्क उपलब्ध होणे आवश्यक आहे. संभाषणाची साधने दुर्गम वाड्यावस्त्यांवर पोहोचावीत यासाठी खासदार श्रीनिवास पाटील प्रयत्नशील राहिले आहेत. केंद्र स्तरावर पाठपुरावा करून त्यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने टॉवर मंजूर झाले आहेत. मंजुरी मिळालेले टॉवर विविध ठिकाणी विशेषतः दुर्गम भागात उभारले जाणार आहेत. त्यामुळे त्या भागातील जनता मोबाईलच्या रेंजमध्ये येणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात या भागातील विद्यार्थ्यांना मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यावेळी उंच टेकडीवर जाऊन विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र आता या परिस्थितीत बदल होऊन टॉवर होण्यामुळे विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा होणार आहे. तसेच नोकरीनिमित्त मुंबई, पुण्यात येथील माथाडी कामगार मोठ्याप्रमाणात आहे. त्यांना देखील गावाकडील नातेवाईकांशी संपर्क साधताना सुलभता येईल.टॉवर उभारणीने त्यांना येणाऱ्या अडचणी सुटू शकतील असा विश्वास निर्माण झाला असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
याप्रसंगी बीएसएनएलचे उपअभियंता प्रविण खटावकर, बीएसएनएलच्या टेलिफोन सल्लागार समितीचे सदस्य व पं.स.चे माजी उपसभापती रघुनाथ जाधव, पोपटराव खेडेकर, अधिक पवार, दिलीपराव कोळेकर, संदीप जाधव, श्रीरंग चाळके, सुरेश साळुंखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment