फोर्टिफाईड तांदळाबाबत पसरवणेत येणाऱ्या अफवांवर नागरीकांनी विश्वास ठेऊ नये...
फोर्टिफाईड तांदळाबाबत पसरवणेत येणाऱ्या अफवांवर नागरीकांनी विश्वास ठेऊ नये...
सातारा दि.17:फोर्टिफाईड तांदळाचे अनुषंगाने पसरवणेत येणाऱ्या अफवांवर नागरीकांनी विश्वास ठेऊ नये. सदर फोर्टिफाईड तांदूळाबाबत लाभार्थ्यांना काही शंका, अडचणी असल्यास आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेशी अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना पोषणतत्व गुणसंवर्धित फोर्टिफाईड तांदूळ (पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ) वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यात फोर्टिफाईड तांदूळ वितरण योजना ही पंतप्रधान महोदयांची महत्त्वाकांक्षी योजना असून त्यानुसार सातारा जिल्हयात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थीना फोर्टिफाईड तांदूळ वितरणाची सुरुवात झालेली आहे. हा फोर्टिफाईड तांदूळ पाहता सकृतदर्शनी तांदळात भेसळ असल्यासारखा वाटू शकतो. हा तांदूळ पाण्यावर तरंगू शकतो. पण तो सामान्य तांदळाप्रमाणे सेवनासाठी वापरला जातो. फोर्टिफाईड तांदूळामध्ये लोह, फॉलिक ॲसिड, विटामिन B-12 सूक्ष्म अन्नद्रव्ये असून लाभार्थ्यांच्या आरोग्याचे दृष्टीने शासनाने जाणीवपूर्वक वितरण सुरु केले आहे. सदर फोर्टिफाईड तांदूळामधील लोह हे अशक्तपणा व
तांबड्या पेशींची कमतरता दूर करते. फॉलिक अॅसिड गर्भाचा विकास व नवीन रक्त पेशी बनविणेस उपयुक्त आहे. विटामिन B-12 मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत सुरु ठेवते. अशाप्रकारे फोर्टिफाईड तांदूळ हा पोषणतत्वांनी युक्त तांदूळ असलेने लाभार्थ्याचे आरोग्याचे दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे. फोर्टिफाईड तांदूळ हा सामान्य तांदळाच्या तुलनेत अधिक पौष्टिक असतो. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना पोषक घटक असलेले धान्य मिळावे यासाठी विविध पोषक घटकांचा अंतर्भाव असलेला फोर्टिफाईड तांदूळ वितरीत करणेत येत आहे. फोर्टिफाईड तांदूळ थॅलेसिमिया या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी वैदयकीय सल्ला घेऊनच सदर तांदळाचे सेवन करावे व सिकलसेल ॲनेमिया आजाराने ग्रस्त रुग्णांनी सदर तांदळाचे सेवन करु नये, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने यांनी कळविले आहे.

Comments
Post a Comment