येत्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवा : आ. पृथ्वीराज चव्हाण...

कासारशिरंबे : येथील विकासकामांचा शुभारंभ करताना सारंग पाटील, समवेत आ. पृथ्वीराज चव्हाण व इतर...

येत्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवा : आ. पृथ्वीराज चव्हाण...

कासारशिरंबे येथे विविध विकासकामांचे उद्धघटन...

कराड दि.21-: पक्षातून गद्दारी करणारी मंडळी सत्तेच्या दबावाला बळी पडून बाहेर पडली. याचवेळी केंद्रातील सत्ताधारी पक्ष लोकांना विचलित ठेवून देशात एकाधिकारशाही आणू पाहत आहे. त्यांना जनतेच्या विकासाचे घेणेदेणे नाही. एकीकडे जीएसटीमधून कर गोळा करायचा. आणि तेच पैसे सबसिडी म्हणून द्यायचे. हा जुमला आपण ओळखला पाहिजे. आणि दुसरीकडे  केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी गद्दारी करणाऱ्या मंडळींना हाताशी घेत सत्तेतून राजकारण आणि अर्थकारण या दोन्ही गोष्टी साध्य केल्या आहेत. या मंडळीनी राज्याची सुरू केलेली लूट थांबवा. आणि त्यांना येत्या निवडणुकीत मतदानातून धडा शिकवा. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कासारशिरंबे (ता. कराड) येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, कराड दक्षिण सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, युवा नेते जयेश मोहिते, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. गीतांजली थोरात, दादासाहेब पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जयशंकर यादव, सरपंच उमेश पवार, माजी सरपंच सुदाम बोंद्रे, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक जयवंतराव बोंद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद चौधरी, गट शिक्षणाधिकारी सम्मती देशमाने, शाखा अभियंता शरद मुंडे, लक्ष्मण मंडले यांची प्रमुख उपस्थिती होती.

ते म्हणाले, जीएसटीतील पैसे गोळा करून तेच पैसे जनतेला परत देवून त्याचा गाजावाजा केला जात आहे. यावर आपण समाधानी होवून चालणार नाही. अनेक गोष्टी आपल्या तोट्याच्या झाल्या आहेत. आपण त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

ते म्हणाले, राज्याचे साक्षरतेचे प्रमाण ८३ टक्के आहे. आपले राज्य साक्षरतेच्या बाबतीत केरळपर्यंत जायला वेळ लागेल. साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न होत नाही. शिक्षक भरत्या होत नाहीत. अशा स्थितीचा विचार करून शिक्षण क्षेत्रात बहुजन समाजातील सामान्य मुलांसाठी अनेक संधी आहेत. त्यासाठी आपणच शिक्षणाला चालना दिली पाहिजे.

ते म्हणाले, सत्तेतून राजकारण करण्याची विदारक परिस्थिती आहे. ठेक्यांमध्ये टक्केवारी व बदलीमध्ये पैसे घेवून चालणारी लोकं राज्याचा विकास काय करणार? अनेक जणांवर सरकारी यंत्रणांचा प्रचंड दबाव आहे. देशातील पहिल्या योजनांची नावे बदलली, कलमे बदलली आहेत. आताचे पंतप्रधान केवळ जाहिरातबाजी करत आहेत. पहिल्या पंतप्रधानांनी निवडून येण्यासाठी कधीही जाहिरात केली नाही.

ते म्हणाले, येणाऱ्या निवडणुकांमध्ये सावध राहिला नाही, तर पुन्हा वर्णाश्रम व्यवस्था येईल. व पुन्हा आपल्याला गुलामगिरी पत्करावी लागेल. त्यामुळे शिक्षण महत्वाचे आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संधी आहेत. यासाठी शिक्षक, संस्थाचालक व अधिकाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे.

ते पुढे म्हणाले, राज्यातील राजकीय अस्थिर परिस्थितीत कोणीही पुढे यायला तयार नाही. विकासाकडे कुणाचे लक्ष नाही. सरकार चालवण्यात अपयश आल्याने सुविधा होत नाहीत. बेरोजगारी वाढत आहे. विकासनिधी देताना पक्षपातीपणा केला जात आहे. घोडेबाजार करणाऱ्यांना भरपूर निधी दिला जात आहे.

सारंग पाटील म्हणाले, खा. श्रीनिवास पाटील व आ. पृथ्वीराज चव्हाण हे लोकप्रतिनधी असल्याचे कराड तालुक्याला अभिमानास्पद आहे. सुसंस्कृत, सुस्वभावी नेते आहेत.

ते म्हणाले, आजच्या राजकीय परिस्थितीत सातारा जिल्ह्याकडे सर्वजण वेगळ्या नजरेने पाहतात. दुसऱ्या बाजूला राज्यांना स्वायत्ता दिल्याची वल्गना करणारे केंद्र सरकार मणिपूरसारखे राज्य जळत असूनही त्याकडे हेच सरकार लक्ष देत नाही, हे दुर्दैवी आहे. अघोषित अप्तकाल देशात सुरू आहे. परंतु याकडील लक्ष विचलित करून देश एकाधिकार शाहीकडे नेण्याची ही प्रक्रिया जाणवत आहे. याला येत्या निवडणुकात विरोध नोंदवण्याची वेळ आली आहे.

यावेळी वरिष्ठ मुख्याध्यापक प्रकाश कोळेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त व जयवंतराव बोंद्रे यांची रयत कारखान्याच्या संचालकपदी निवड झालेबद्दल तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्री. देशमाने यांचे भाषण झाले. सरपंच उमेश पवार, माजी सरपंच सुदाम बोंद्रे, मुख्याध्यापक जहाँगीर मुजावर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. दादासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. नारायण सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. विजय बोंद्रे यांनी आभार मानले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक