महाविकास आघाडीत काँग्रेस एक नंबरवर असेल:आ.भाई जगताप; काँग्रेस आपल्या तत्त्वांची एकनिष्ठ, फुटीरतावाद्यांबद्धल जनतेत प्रचंड चीड...
महाविकास आघाडीत काँग्रेस एक नंबरवर असेल:आ.भाई जगताप; काँग्रेस आपल्या तत्त्वांची एकनिष्ठ, फुटीरतावाद्यांबद्धल जनतेत प्रचंड चीड...
कराड, दि. 11 (प्रतिनिधी) - गेल्या एक-दीड वर्षात राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना व राष्ट्रवादीमधील फुटीबाबत लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. देशात विरोधकांचे दबावतंत्र, पक्षांतर्गत राजकारणाचे परिणाम कर्नाटकात दिसून आले. तसेच परिणाम महाराष्ट्रातही दिसतील. त्याचबरोबर ते शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतही दिसून येतील. परंतु, राज्यात अद्याप महाविकास आघाडी अबाधित महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरवर असेल, असा विश्वास सातारा लोकसभा मतदार संघ निरीक्षक आ. भाई जगताप यांनी व्यक्त केला.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा अल्पना यादव, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस एड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, रणजीतसिंह देशमुख, निवास थोरात उपस्थित होते.
आ. भाई जगताप म्हणाले, राज्यात सध्या महाविकास आघाडीच असून यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी धर्माचे पालन करत आहेत. त्यामुळे सध्याच्या घडामोडी पाहता किमान आजतरी कॉंग्रेसचा कोणताही वेगळा विचार नाही. राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनासंदर्भात महाविकास आघाडी म्हणून बैठका होतील, त्यावेळी उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करता येईल. देशासह राज्यात घडलेल्या राजकीय दबावतंत्र व अंतर्गत राजकारणाच्या घडामोडीत पक्षाने आपले लोकशाही विचार सोडले नसून कॉंग्रेस आपल्या तत्त्वांची एकनिष्ठ राहिला. त्यामुळे देशासह राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वेगळी उर्जा दिसून येत आहे.
ते म्हणाले, दहा वर्षात विरोधकांनी काँग्रेस नेतृत्वावर प्रचंड टीका केली. परंतु, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी त्यांना आपल्या कृतीतून सडेतोड उत्तर दिले आहे. कर्नाटक, राजस्थान, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असून भाजपकडेही चारच राज्यांची सत्ता आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाने भाजपला धोबीपछाड दिली. मोदींनी देशातील जनतेला दिलेल्या आश्वासनांपैकी प्रत्यक्षात किती कामे झाली, हे पाहणे गरजेचे आहे. तसेच कर्नाटकच्या निवडणुकीत जे चित्र दिसले, ते आगामी निवडणुकांमध्येही पाहायला मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा व अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ. भाई जगताप व आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीअंतर्गत कराड दक्षिण, उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघातील विभागनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा घेण्यात आली. याबाबत बोलताना ते म्हणाले, या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांकडून मते व समस्या जाणून घेतल्या आहेत. याचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सदर करायचा आहे. शनिवारी सातारा येथे अन्य विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर जागा वाटप व बाबींवर भूमिका मांडता येईल.
काँग्रेसकडे धुलाई मशीन नाही
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यानंतर अन्य काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे? या प्रश्नावर आ. जगताप म्हणाले, राज्यात दीड वर्षाच्या कालावधीत मोठ्या दोन पक्षांमध्ये फुट पडली. यामध्ये, दबाव तंत्राला बळी पडून अनेकजणांनी पक्षांतर केले असून भ्रष्ट लोकांची संख्या जास्त आहे. परंतु, भाजपप्रमाणे कोणालाही प्रवेश द्यायला काँग्रेसकडे धुलाई मशीन नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
तीन सप्टेंबरपासून ‘भारत जोडा’चा दुसरा टप्पा...
पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो पदयात्रेला उत्स्फूर्त व अबूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याचे परिणाम नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दिसून आले. आता 3 सप्टेंबरपासून या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत असून विभागानुसार राहुल गांधी आणि अन्य नेत्यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे आ. जगताप यांनी यावेळी सांगितले.
पत्रकारांवरील हल्ल्यांचा निषेध..
पत्रकारांवर होत असलेया हल्ल्यांच्या घटनांबाबत विचारले असता आ. भाई जगताप म्हणाले, देशात सध्या विचित्र परिस्थिती असून कोणत्याही विचारांचे अधिष्ठान नसलेला लोकांकडून गैरकृत्य होत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींवर हल्ले होण्याच्या घटना निंदनीय असून पत्रकाराला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा त्यांनी निषेध नोंदवला.

Comments
Post a Comment