चलो दिल्ली: आता हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस कराडला थांबणार...

 


चलो दिल्ली: आता हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस कराडला थांबणार...

कराड दि.18-प्रत्येक रविवारी दिल्लीला जाणारी हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस रेल्वे आता सातारा व कराड येथे थांबणार आहे. यासाठी खा. श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याने सातारा जिल्ह्यातून उत्तरेत जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस मिरजेतून प्रत्येक रविवारी धावणार आहे. मात्र या गाडीला सातारा व कराड येथे थांबा नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना मिरज किंवा पुणे रेल्वे स्थानकावर जावे लागत होते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत असल्याने ही गाडी कराड येथे थांबावी अशी मागणी विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती. तसेच गोपाळ तिवारी यांनी त्यासाठी पुढे प्रयत्न केले. या मागणीची दखल घेऊन खा.श्रीनिवास पाटील यांनी सदरची रेल्वे गाडी कराड आणि सातारा येथील रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात यावी अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. त्या पाठपुराव्याला यश आले असून हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस रेल्वे आता सातारा आणि कराड रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे.

ही गाडी प्रत्येक रविवारी सकाळी ६:०२ वाजता कराड रेल्वे स्टेशनवरून सुटून सातारा, जेजुरी, पुणे, लोणावळा, कल्याण (मुंबई), वसई रोड (मुंबई), वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा येथे थांबून दिल्लीच्या निजामुद्दीन स्टेशनला दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४५ वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून प्रत्येक शुक्रवारी रात्री ९:४० वाजता सुटून कराड रेल्वे स्टेशनला शनिवारी रात्री १०:३७ वाजता पोहोचेल. याशिवाय चंदीगढ-यशवंतपूर संपर्क क्रांती, निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांती तसेच कोल्हापूर-अहमदाबाद व बेंगलोर-जोधपुर या रेल्वे गाड्यां साताऱ्यात थांबतात मात्र कराडात थांबत नाहीत त्यासाठी या गाड्यांना कराड येथे थांबा देण्याची मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.

दरम्यान हजरत निजामुद्दीन ते मिरज एक्सप्रेस रेल्वे आता सातारा व कराड रेल्वे स्टेशनवर थांबणार असल्यामुळे गुजरात, राजस्थान आणि दिल्ली बरोबरच सातारा जिल्हा सुद्धा उत्तर भारताशी कनेक्ट झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक