आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पायपीट करून पाझर तलावाची केली पाहणी...
आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पायपीट करून पाझर तलावाची केली पाहणी...
ओंडोशी येथील पाणी प्रश्न सोडवण्याची ग्वाही ; ग्रामस्थांनी केले स्वागत...
कराड दि.19-: ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कराड दक्षिण मतदारसंघात डोंगरी भागातील गावांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ओंडोशी येथे अशीच स्थिती असल्याने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी गावास भेट देत याप्रश्नी लक्ष घातले. आ. चव्हाण यांनी गावालगत डोंगर उतारावरील पाझर तलावाची पाहणी करण्यासाठी तब्बल दहा किलोमीटर पायपीट करणे पसंत केले. त्यांनी डोंगर वाट तुडवत पाझर तलावाची पाहणी केली. व पाणी प्रश्न जाणून घेत उपाययोजना करण्याबाबत ग्रामस्थ व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आ. चव्हाण यांनी मतदरसंघातील दळणवळण व पाणी प्रश्नाबाबत प्राधान्याने लक्ष घातले आहे. गुरुवारी सकाळी कराड येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत पुणे - बेंगलोर महामार्गावर पंकज हॉटेल ते मलकापूर येथील शिंदे मळ्यापर्यंतच्या मार्गावर होणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच कराड व मलकापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आगाशिवनगर ते वारुंजी दरम्यान पुल व रस्ता उभारण्याच्या पर्यायाबाबत चर्चा झाली. तसेच पाचवड ते कोडोली नदीवरील पुलासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा प्रश्न जाणून घेत त्यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचबरोबर तालुक्यातील गावांच्या पाणीप्रश्नांचा आढावा घेतला.
गुरुवारी सायंकाळी आ. चव्हाण यांनी ओंडोशी येथील नियोजित दौरा केला. यावेळी त्यांनी गावालगतच्या पाझर तलावाकडे दहा किलोमीटर पायपीट केली. तेथे त्यांनी वनक्षेत्रात पाझर तलाव असल्याने वनविभागाशी चर्चा करून तलावातील पाणी शेती व पिण्यासाठी घेता येईल का, याची माहिती वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल आनंद जगताप यांच्याकडून जाणून घेत हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. दरम्यान आ. चव्हाण यांनी चालत प्रवास केल्याने ग्रामस्थांनी त्यांच्या विकासाच्या तळमळीविषयी आश्चर्य व्यक्त केले. गावात परतल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील - उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील - चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, कराड दक्षिण सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, जखिणवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र नांगरे - पाटील, सवादेचे उपसरपंच नितीन थोरात, राजेंद्र मोरे, रावसाहेब मोरे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आनंदराव थोरात, बाजीराव थोरात, सरपंच यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment