शाळा क्रमांक 3 ने समाजभान जपणारी पिढी घडवली;पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर
शाळा क्रमांक 3 ने समाजभान जपणारी पिढी घडवली;पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांचे गौरवोदगार... कराड पालिका शाळेचा 56 वा वर्धापन उत्साहात...
कराड दि.27-कराड नगरपरिषद शाळा क्रमांक तीन शासकीय शाळा कशी असते याचे उत्तम उदाहरण आहे. या शाळेने गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवताना आर्थिक सक्षक व दुर्बल असा भेदभाव ठेवला नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला समान मानून समाजभानाचा पाया त्यांच्या संस्कारात रूजवला. समाजभान जपणारे हेच विद्यार्थी भविष्यात कराडचे नाव जगभरात पोहचवतील असे गौरवोद्गार पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी काढले.
कराड नगरपरिषद शाळा क्रमांक तीनचा 56 वा वर्धापन दिन शनिवारी अत्यंत आनंदमय वातावरणात संपन्न झाला. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी अनुष्का ठाकूर यांच्या शुभहस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांच्या संकल्पनेतून सजवलेली शाळा व विद्यार्थ्यांनी केलेला सेलिब्रेशन पेहराव लक्षवेधी ठरला. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मनिषा चांदे,उप मुख्याध्यापिका जयश्री जाधव उपस्थित होत्या.
56 व्या वर्धापन दिनानिमित्त पहिली ते सातवीच्या हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शुभेच्छापत्रे तयार केली होती. विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेली शुभेच्छापत्रे पाहून मान्यवरांसह पालक भारावून गेले.
उपअधिक्षक अमोल ठाकूर म्हणाले, कराडची शाळा क्रमांक तीन गुणवत्तेत, संस्कारात, खेळात, समाजभानात राज्यात अग्रेसर असल्याचे इथे आल्यावर जाणवले. या शाळेच्या प्रवेशद्वाराच्या आत विद्यार्थ्यांच्यात कसलाही भेदभाव न करता त्यांच्या कलाने त्यांच्यावर संस्कार केले जातात. यावर मुख्याध्यापक कोळी सरांसह त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, कर्मचारी लक्ष ठेवून असतात. पालकांनीही विद्यार्थ्यांवर मार्कांच्या अपेक्षा न लादता सातवीपर्यंत त्यांच्या आवडीने घ्यावे. मुलांशी दररोज किमान एक तास तरी संवाद साधत रहावे. त्यामुळे मुले आणि पालक यांच्यातील नाते मैत्रीचे होऊन मुले शाळेत किंवा बाहेर जे काही घडते ते अगदी मनमोकळेपणाने सांगतात. शाळा क्रमांक तीनची प्रगती ही राज्याच्या शिक्षणाला दिशा देणारी आहे.
मुख्याध्यापक अर्जुन कोळी प्रास्ताविक करताना भावनिक झाले. ते म्हणाले शाळा क्रमांक तीन हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.या शाळेमुळ माझा देशात आदर्श मुख्याध्यापक म्हणून नावलौकिक प्राप्त झाला.इथे आलेला प्रत्येक विद्यार्थी समाजात भक्कमपणे उभा रहावा म्हणून आम्ही सर्व सामुहिक प्रयत्न करत असतो. शासनाने देशपातळीपर्यंत शाळेचा गौरव केला आहे. अत्यंत हालाखीची परिस्थिती असणारे आणि उच्चभ्रू कुटूंबातील सर्वांना समान न्याय देताना हे सर्व विद्यार्थी गुणवत्तेत आले पाहिजेत असा प्रयत्न सातत्याने आहे. या शाळेच्या यशस्वी वाटचालीचे खरे योगदान हे पालकांना जाते. पालकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्याबाबतीत सार्थ ठरवण्यासाठी मेहनत घेत आहोत.
पोलीस उपअधिक्षक ठाकूर यांच्या हस्ते 56 व्या वर्धापन दिन शुभेच्छापत्रांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमांला उपस्थित शेकडो पालकांनी शाळा व्यवस्थापनाचे तोंडभरून कौतूक केले. सर्व शिक्षक, कर्मचारी यांच्यातील उत्साह वर्धापनदिनाचा आनंद द्विगुणीत करून गेला. पर्यवेक्षक संग्राम गाढवे यांनी आभार मानले.


Comments
Post a Comment