कराडच्या कोर्टात एकाला फाशीची शिक्षा; दीड वर्षांपूर्वी मुलीवर बलात्कार करून तिचा केला होता खून...
कराड दि.21 (प्रतिनिधी) आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी रुवले (ता. पाटण) येथील संतोष थोरात (वय 41 ) याला फाशीची शिक्षा कराडच्या न्यायालयात सुनावली आहे. येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी ही शिक्षा सुनावली. कराडच्या न्यायालयाच्या इतिहासातील ही पहिली शिक्षा असल्याचे मत अनेक विधी तज्ञांनी व्यक्त केले आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले.
याप्रकरणी सरकार पक्षाचे वकील ऍड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद आणि ढेबेवाडी पोलिसांनी पुराव्यासह सादर केलेले दोषारोपपत्र ग्राहय़ मानून न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा लागल्याने बाललैंगिक अत्याचार कायदा आणि लोकांचा न्यायालयावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे मत सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी व्यक्त केले आहे.
संबंधित मुलीवर 29 डिसेंबर 2021 रोजी रुवले येथे बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. पिडीत मुलगी व तिची मैत्रिण आरोपी थोरात याच्या घरासमोर खेळत होत्या. त्या त्यापैकी एक मुलगी घरी गेली व पिडीत मुलगी एकटीच खेळत होती. याचाच फायदा घेत थोरात यांने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घराच्या पाठीमागे निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर थोरात यांने तिचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह नजीकच्य झुडपात फेकून दिला होता व त्यानंतर तो फरार झाला होता.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला मात्र ती रात्री उशिरापर्यंत सापडू शकत नाही कुटुंबीयांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी गावात येऊन चौकशी व विचारपूस करत असताना एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी संतोष थोरात याच्या बरोबर पीडीत मुलगी गेल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच आरोपीबरोबर मुलीला जाताना तिची मैत्रिण, आजी, व नजीक असणाऱ्या दोन महिलांनी पाहिले होते. यानुसार आरोपीला ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या टीमने थोरात याला अटक केली होती.

Comments
Post a Comment