आ. पृथ्वीराज चव्हाण ई-मेल धमकी प्रकरण; तालुका काँग्रेसच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन...
आ. पृथ्वीराज चव्हाण ई-मेल धमकी प्रकरण; तालुका काँग्रेसच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन...
कराड दि. 31 (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांना ई-मेलद्वारे दिलेल्या धमकीच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आज कराड तालुका काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे कराड पोलीस प्रशासनास केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना आज हे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांना अज्ञात इसमाकडून ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली असून याबाबत आपले स्तरावरुन पोलिस यंत्रणेस योग्य त्या संरक्षणात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल संभाजी भिडे यांनी काढलेले आक्षेपार्ह विधानाबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये भिडे यांचे विधानाबाबत चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत सभागृहामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सदर प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिलेले आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी भिडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात केलेल्या मागणीमुळे समाजातील काही अपप्रवृत्तींनी त्यांना धमकीचा ई-मेल त्यांचे कराड कार्यालय या ठिकाणी पाठविलेला आहे. या संदर्भात कराड शहर पोलिस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही पोलिस यंत्रणेमार्फत सुरु आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना ई-मेलद्वारे दिलेली धमकी विचारात घेता, आपल्या विभागाकडून याचा गांभयपुर्वक विचार करून कायदेशीर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री व राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे. मराठी माणसाचा बाणा दाखवत त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची विधानसभा सभागृहात मागणी केली आहे.आ. चव्हाण हे पुरोगामी विचारसरणीचे पाईक आहेत. सातारा जिल्ह्याला स्वातंत्र्य लढ्याची मोठी परंपरा लाभली आहे. सातारा जिल्ह्याने स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशामध्ये तीन जिल्ह्यामध्ये प्रतीसरकार स्थापन झाले होते. त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आजही जपला जात आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे स्वातंत्र्य लढ्याचे महानायक असून फुले दापत्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग काम केले असून, श्री साईबाबा हे सर्व साई भक्तांचे श्रध्दास्थान आहे. तसेच स्वातंत्र्य सेनानी व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे कृषी क्रांतीचे जनक आहेत. या सर्व महान व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह विधाने करुन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हि बाब अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. सध्या स्वातंत्र्यांचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात असताना जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
तथापि, आ. पृथ्वीराज चव्हाण यांना ई-मेलद्वारे धमकी देणाऱ्या इसमाची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. याबाबत आम्हा सर्वांच्या भावना तीव्र स्वरुपाच्या असून राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने सदरचे निवेदन देत असून अशा समाजातील अपप्रवृत्तींना शांततेच्या मार्गाने उत्तर देवू यापुढे आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल असे काही कृत्य घडल्यास त्या प्रवृत्तींना त्याच पध्दतीने उत्तर देण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी कराड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, प्रा धनाजी काटकर, अशोकराव पाटील, विद्या थोरवडे, नीलमताई येडगे, निवास थोरात, अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment