कराडात नागरी सहकारी बँकांसाठी फायनान्सिअल इंटेलिजन्स युनिट दिल्लीतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम...
राष्ट्रीय सुरक्षा राखण्यात बँकांची महत्वाची भूमिका : वसुद तोरसेकर...
कराडात नागरी सहकारी बँकांसाठी फायनान्सिअल इंटेलिजन्स युनिट, नवी दिल्ली तर्फे प्रशिक्षण कार्यक्रम..
कराड दि 22-कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. कराडचे शासन मान्यताप्राप्त सेवक प्रशिक्षण केंद्र आणि फिटेलेक्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने फायनान्सिअल इंटेलिजन्स युनिट, नवी दिल्ली यांच्यातर्फे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरी सहकारी बँकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात नुकतेच करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी ७७ सहकारी बँकांनी सहभाग घेत या बँकातील जवळपास २०० हून अधिक अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
फायनान्सिअल इंटेलिजन्स युनिट, नवी दिल्ली ही संस्था सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांमधून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवणे, अँटी मनी लॉन्ड्रींगला आळा घालणे यासाठी भारतातील सर्व आर्थिक संस्थांसाठी नोडल एजन्सी म्हणून कार्य करते. सदर संस्थेच्या जॉइंट डायरेक्टर सौ. वसुद तोरसेकर, शिरीष पाठक (फिटेलेक्ट संस्थेचे संस्थापक संचालक), सौ. अमिता आजगांवकर (प्रशिक्षक, फिटेलेक्ट आणि सहकारी बँकेतील माजी उच्च अधिकारी), सौ. अर्पिता बेडेकर (डायरेक्टर व प्रशिक्षक, फिंटेलेक्ट) यांनी उपस्थितांना यासंबंधीचे कायदे, बँकांनी सादर करावयाची विविध माहिती, त्याचे महत्त्व आणि सदर माहितीच्या आधारे केली जाणारी कार्यवाही याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच, बँकांना याबाबतचे कामकाज करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, सदर माहिती संकलनासाठी असणारी विविध सॉफ्टवेअर्स आणि प्रणाली याविषयी उपस्थित बँक अधिकाऱ्यांच्या सूचना समजावून घेऊन त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण तत्काळ केले.
सदरची संस्था दिल्ली स्थित असल्याने या संस्थेमार्फत होणारे प्रशिक्षण वा संवाद मेळावे हे इंग्रजी माध्यमातून होत असतात. त्यामुळे अशा प्रशिक्षणातून सर्वांगीण माहिती मिळविण्यात आणि अडचणी मांडण्यास भाषा हा मोठा अडसर असतो. परंतु, कराड अर्बन बँकेच्या पुढाकाराने सदरचा कार्यक्रम मराठी भाषेतून आणि मराठी भाषिक असणाऱ्या प्रशिक्षकांकडून आयोजित केला असल्याने याचा उपयोग दैनंदिन कामकाजात खूपच चांगल्याप्रकारे करता येईल असे मत विविध बँकांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस अर्पिता बेडेकर यांनी फिंटेलेक्ट संस्थेची थोडक्यात माहिती सांगून याबाबत त्यांच्यामार्फत जागतिक स्तरावर झालेल्या सर्वेक्षणाचा आढावा विशद केला. प्रमुख अतिथी सौ. वसुद तोरसेकर यांनी अगदी सहज सोप्या मराठी भाषेत उपस्थित सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांना पी. एम. एल. ए. कायद्यांतर्गत त्यांची जबाबदारी काय असते याची माहिती दिली. तसेच जागतिक नियामक एफ.ए.टी.एफ यांच्यामार्फत आपल्या देशाच्या चालू असणाऱ्या मूल्यमापनाबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. सहकारी बँकांनी सर्व निर्देशांचे अचूक अनुपालन करावे असे आवाहन त्यांनी केले. नव्याने कार्यान्वित केलेल्या फिननेट २.० या रिपोर्टिंग पोर्टलविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली आणि याबाबत दूरभाष्य प्रणालीद्वारे देण्यात आलेल्या प्रशिक्षणात दिल्लीस्थित प्रशिक्षक व बँकांचे अधिकारी यांच्यादरम्यान अनुवादकाची भूमिका बजावली. अमिता आजगावकर यांनी सहकारी बँकांना ए.एम.एल कामकाजाचे अनुभव, त्यातील तीव्रता आणि आपले रिपोर्टिंग कसे चांगले करावे यासाठी उदाहरणांचे दाखले देत माहिती दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व प्रास्ताविक कराड अर्बन बँकेचे के. वाय. सी. व ए.एम.एल. विभागाचे साहाय्यक महाव्यवस्थापक सीएस. अमित रेठरेकर यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी केला. त्यांनी याअनुषंगाने सर्व सहकारी बँकांना प्रशिक्षण व सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आणि कार्यक्रम संपन्न झाला.

Comments
Post a Comment