कराड अर्बन ने जप्त केलेल्या तारण मिळकतीमध्ये अनाधिकृत घुसखोरी केल्याबद्दल चौघा विरोधात गुन्हा दाखल
कराड अर्बन ने जप्त केलेल्या तारण मिळकतीमध्ये अनाधिकृत घुसखोरी केल्याबद्दल चौघा विरोधात गुन्हा दाखल... चौघांना अटक... न्यायालयाकडून पोलीस कोठडी...
कराड दि. 26 (प्रतिनिधी) कराड अर्बन बँकेने कायदेशीर वसुली कारवाई पोटी जप्त केलेल्या तारण मिळकतीमध्ये अनाधिकृतपणे घुसखोरी केल्याबद्दल चौघा विरोधात कराड पोलिसात गुन्हा दाखल होऊन चौघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कराड अर्बन बँकेच्या मलकापूर शाखेच्या थकबाकीदार असणाऱ्या सहारा इंटरप्राईजेस तर्फे सौ शमशाद ताजुद्दीन पटेल, तरबेज ताजुद्दीन पटेल, तोहीद ताजुद्दीन पटेल तोफिक ताजुद्दीन पटेल यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेद्वारे थकीत कर्जपोटी कोयना वसाहत येथे पटेल यांची असणारी मिळकत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने व तहसीलदार यांच्यामार्फत जप्त करून कर्ज वसुलीपोटी बँकेच्या ताब्यात घेण्यात आली होती.
बँकेने जप्त केलेल्या या मिळकती मध्ये वरील चौघांनी प्रवेश करून मिळकतीला केलेले सील तोडून व लावलेले कुलूप कटरच्या साह्याने उचकटून मिळकतीमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केला. त्याबद्दल बँकेच्या अधिकारी यांनी संबंधित चौघा विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी वरील चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठेवीदार यांनी ठेवलेल्या ठेवीवर आधारित बँकेद्वारे केल्या जाणाऱ्या कर्ज वाटपाच्या वसुली कामी कायदा हातात घेऊन बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या कर्जदारांना यामुळे वचक बसेल व ठेवीदार यांना देखील बँक कर्ज वसुली कारवाई प्रभावीपणे करत असल्याचा विश्वास मिळेल असे प्रतिपादन यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांनी केले.

Comments
Post a Comment