कराडात गुजर माने यांच्या शिवसेना प्रवेशाची नुसतीच चर्चा...
कराडात गुजर माने यांच्या शिवसेना प्रवेशाची नुसतीच चर्चा...धोरणात्मक निर्णयानंतरच पक्ष प्रवेश करणार-गुजर, माने...
कराड दि 25 (प्रतिनिधी) शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी आज येथील माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर व राजेंद्र उर्फ आप्पा माने यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केल्याशिवाय व कोणताही धोरणात्मक निर्णय झाल्याशिवाय ठाकरे गटातील प्रवेशाबाबत सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका दोघेही माजी नगरसेवकांची दिसून येत आहे.
माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या कन्येचा विवाहास खा. संजय राऊत येणार होते. मात्र त्यांना त्यांच्या अडचणीमुळे येता आले नाही म्हणून आज खा. राऊत यांनी इंद्रजीत गुजर यांची त्यांच्या कॉलेजमध्ये भेट घेतली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना संजय राऊत यांनी केवळ चर्चा झाल्याचे सांगितले तर गुजर यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका प्रवेशाबाबत व्यक्त केली नाही.
दरम्यान पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाकडून पदाची जबाबदारी व पक्ष वाढीसाठी वरिष्ठांची मदत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय संघटनेचे काम करता येत नाही. त्यामुळे पक्षाच्या प्रमुखांशी भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करूनच पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला जाईल अशी भूमिका माजी नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने यांची आहे.
मात्र माध्यमाशी बोलताना इंद्रजीत गुजर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णय घेतला जाईल तसेच त्या अनुषंगाने कराडत मेळाव्याच्या माध्यमातून प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल अशी ही काहीशी अस्पष्ट व संधिग्ध भूमिका व्यक्त केली असली तरी ते उचित पदाशिवाय शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत अशीच सध्या तरी त्यांची भूमिका दिसून येत आहे.
दरम्यान खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी येथील प्रीतीसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment