कराड शहरावर पाणी कपातीचे संकट; दोन्ही वेळेचा पाणीपुरवठा होणार कमी...
कराड शहरावर पाणी कपातीचे संकट; दोन्ही वेळेचा पाणीपुरवठा 15 मिनिटे होणार कमी...
कराड दि.23 (प्रतिनिधी) यावर्षी पाऊस लांबला असून कोयना धरणात अल्प पाणीसाठा असल्याने सर्वत्र पाणीटंचाई जाणवणार आहे. या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषदेला पाणीपुरवठा करताना पाणी कपात करावी लागणार आहे. त्यामुळे 26 जून पासून सकाळी व सायंकाळी 15 मिनिटे पाणी पुरवठा कमी केला जाणार आहे. याची नागरिकांनी दखल घेऊन पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आव्हान मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे केले आहे.
कराड नगर परिषदे कडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कराड शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत व उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली आहे. सरासरी सात जून नंतर आपल्याकडे पावसाळा सुरू होतो परंतु यावर्षी 23 जून अखेर अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे कराड शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कोयना धरणात खूप कमी पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई निवारण करिता विशेष कृती आराखडा करून त्याच्या अंमलबजावणी करण्याबाबत शासनाकडून सूचना मिळाल्या आहेत.
तसेच जलसंपदा विभागाकडून नळ पाणीपुरवठा योजनेस पिण्याचे पाणी वापरास कोयना नदीतून पाणी उचलण्यास मान्यता मिळालेल्या पाणी कोटापैकी सुमारे 60 टक्के पाणी कोटा वापरून पूर्ण झालेला आहे. त्यामुळे नदीतून पाणी उचलण्यासाठी उर्वरित पाणी कोटा जपून वापरणे आवश्यक आहे. म्हणजे तो पाणी कोटा जास्त दिवस पुरेल. अन्यथा नगर परिषदेस भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल. याकरिता पाणी कपात करणे हे आवश्यक आहे
सध्या स्थितीत पाणी कपात करून पाण्याचा वापर कमी केला तर भविष्यात पाऊस पडेपर्यंत सदरचा पाणीपुरवठा पुरेल. त्यामुळे कराड नगर परिषदेमार्फत केला जाणाऱ्या पाणीपुरवठा वेळेत 26 जून पासून सकाळी व सायंकाळी पंधरा मिनिटे कमी केला जाणार आहे. तरी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पिण्याच्या पाण्याची बचत करावी व नगरपरिषद सहकार्य करावे अशीही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Comments
Post a Comment