बाजार समितीचा विकास करण्यात सत्ताधारी गट सपशेल अपयशी;आ.पाटील...

 


बाजार समितीचा विकास करण्यात सत्ताधारी गट सपशेल अपयशी;आ.पाटील...

पाल येथे शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ...

पाल दि.22- : कराड बाजार समितीचा विकास करण्यात सत्ताधारी गट सपशेल अपयशी ठरला आहे. या अपयशी सत्ताधाऱ्यांना हटवून मतदारांनी शेतकरी विकास पॅनेलला सत्ता द्यावी. येत्या काळात आम्ही कराड येथील बाजारासह उंब्रज, मसूर या उपबाजारांचाही सर्वांगीण विकास करुन दाखवू, अशी ग्वाही आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचार शुभारंभ सभेत ते बोलत होते.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पाल येथे श्री खंडोबा देवस्थानच्या साक्षीने शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आ. बाळासाहेब पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

त्यानंतर झालेल्या प्रचार शुभारंभ सभेत बोलताना आ. पाटील पुढे म्हणाले, गेल्या काळात बाजार समितीवर सत्तेवर असताना आम्ही शेतकऱ्याला मोठा दिलासा देण्याचे काम केले. त्या काळात आम्ही बाजार समितीचे उत्पन्न वाढवून दाखविले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी, धान्य बाजारासाठी शेड उभारण्याचे कामही केले. लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने कराड बाजार समितीच्या उज्वल भवितव्यासाठी आम्ही सर्वजण पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र आलो आहोत. कराडच्या बाजार समितीला देशपातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराडमध्ये भाजीपाला, टोमॅटो, सोयाबीन, गूळाची मोठी बाजारपेठ आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळवून देण्याची जबाबदारी असताना, सत्ताधाऱ्यांनी मात्र निव्वळ राजकारणासाठी बाजार समितीचा वापर केला. छोट्याछोट्या सोसायट्या निर्माण करून तिथे मतदार करायचे आणि आपले सत्तास्थान अबाधित ठेवायचे, असा उद्योग सत्ताधाऱ्यांनी चालविवला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आ. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. पॅनेल उभे करताना आम्ही अनुभवी आणि काही नवे तरुण उमेदवार दिले आहेत. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून काम करण्याची आमची भूमिका राहील. लोकांनी प्रगतीच्या दिशेने वाट धरली असून, यंदा बाजार समितीत परिवर्तन अटळ आहे.

माजी आमदार आनंदराव पाटील म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीला केवळ राजकारणाचा अड्डा बनविले आहे. आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील गोकुळ, राजारामबापू दूध संघाचा एवढा मोठा विस्तार झाला असताना; कोयना दूध संघ, खरेदी-विक्री संघ या संस्थांची परिस्थिती काय आहे, याचा विचारच करायला नको. संस्था वाढवायची नाही, तर त्या संस्थेला केवळ राजकारणाचा अड्डा करणे हा त्यांचा उद्योग आहे. अशा प्रवृत्तींना धडा शिकविण्याची गरज आहे.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले,  सहकारात चांगले काम करणाऱ्या समविचाराची लोकांची नैसर्गिक युती म्हणजे शेतकरी विकास पॅनेल आहे. संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सत्ताधारी मात्र भविष्याची दिशा न सांगता केवळ राजकारणाच्या गप्पा मारत आहेत. कराड बाजार समिती एवढी मोठी संस्था असतानाही तिची उलाढाल एवढी तुटपुंजी कशी? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी देण्याची गरज आहे. आ. बाळासाहेब पाटील यांनी  पुढाकार घेतल्याने या चांगल्या कामाला निश्चित यश येणार याची खात्री आहे.

यावेळी शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार जगदीश जगताप, मानसिंगराव जगदाळे, विनोद जाधव, दयानंद पाटील, उद्धवराव फाळके, जयवंत मानकर, दत्तात्रय साळुंखे, रेखाताई पवार, मालन पिसाळ, फिरोज इनामदार, मारुती बुधे, मानसिंग पाटील, प्रदीप शिंदे, अंकुश हजारे, आनंदराव मोहिते, संतोष पाटील, राजेश शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवराज पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, प्रशांत यादव, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक सर्जेराव खंडाईत, माजी संचालक भास्कर गोरे, कराड पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब निकम, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, कृष्णा बँकेचे संचालक नारायण शिंगाडे, माजी संचालक महादेव पवार, हणमंतराव जाधव यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवराज पाटील यांनी प्रास्तविक केले. शहाजी चव्हाण यांनी आभार मानले.

बाळासाहेबांनी साधला पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा...

‘आज जेव्हा आम्ही त्यांच्या विरोधात लढतोय तेव्हा आम्हाला प्रस्थापित म्हणून हिणवले जातेय. पण मग जेव्हा यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांनी आमची मदत घेतली आणि पदं भोगली, त्यावेळी तुम्हाला प्रस्थापितांची मदत कशी काय चालली? तुमचे हे दुटप्पी वागणे बंद करा’, असा इशारा देत आ. बाळासाहेब पाटील यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

जितका प्रचार कराल, तितका तुमचा पराभव अटळ!...

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी एका सभेत ‘मी सहकारातील निवडणुकीत भाग घेत नाही’, असे विधान केले होते. या विधानाचा खरपूस समाचार घेताना डॉ. अतुल भोसले म्हणाले, सहकारात ज्यांनी एखादी संस्था किंवा सोसायटी काढली नाही, ते सहकारात काय भाग घेणार? त्यांच्या पॅनेलच्या उमेदवारांनाही ते ओळखू शकत नाहीत. या निवडणुकीत ते जितका प्रचार करतील, तितके सत्ताधाऱ्यांचे पॅनेल पराभवाच्या जवळ पोहचेल. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी  जास्तीत जास्त प्रचार करावा, असा उपरोधिक टोला डॉ. भोसले यांनी आ. चव्हाण यांना लगाविला.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक