कराडच्या बाजार समितीवर दुष्ट आणि अभद्र युतीचा डोळा; आ.पृथ्वीराज चव्हाण...

 


कराडच्या बाजार समितीवर दुष्ट आणि अभद्र युतीचा डोळा; आ.पृथ्वीराज चव्हाण...

उंडाळे येथे कार्यकर्त्यांचा मेळावा ; मतदारांची अलोट गर्दी...

कराड,दि.26- कराड तालुक्यातील विशिष्ट लोकांनी आयुष्यभर केवळ संस्था बळकावल्या. यातून त्यांनी स्वतःचे आर्थिक विश्व उभे केले. अशा लोकांच्या हातात कराडची बाजार समिती द्यायची का? असा सवाल करत विरोधकांनी दुष्ट व अभद्र युती करून बाजार समितीला गिळंकृत करण्यासाठी आखलेला डाव उधळून लावा असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

उंडाळे (ता. कराड) येथे कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या लोकनेते स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलच्या प्रचारार्थ विकास सेवा सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

पॅनेलचे प्रमुख उदयसिंह पाटील - उंडाळकर, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, तालुका काॅंग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, वसंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, एम. जी. थोरात, कराड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील, कराड पंचायत समितीच्या माजी सभापती फरिदा इनामदार, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, विद्याताई थोरवडे, अजितराव पाटील - चिखलीकर, अशोकराव पाटील, प्रा. धनाजी काटकर, शंकरराव खबाले, सुदाम दिक्षीत, जयेश मोहिते, निवासराव थोरात, पैलवान नानासाहेब पाटील, इंद्रजित चव्हाण, अविनाश नलवडे, नामदेव पाटील, प्रदीप पाटील, नरेंद्र नांगरे - पाटील, नितीन थोरात, सर्व उमेदवार व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराडची बाजार समिती स्वातंत्र्यापूर्वी निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही संस्था निर्माण झाली. शामराव पाटील हे पहिल्यांदा सभापती झाले. त्यानंतर विलासकाकांनी बाजार समितीच्या प्रगतीसाठी घाम गाळला. कराडसारख्या मोठ्या शहरात एवढी मोठी जागा मिळवत फळ व भाजीपाला मार्केट, बैल बाजार, मसूर व उंब्रज येथे उप आवार या सुविधा त्यांनी निर्माण केल्या. बाजार समितीकडे आज दहा कोटी रुपयांचा नफा आहे. निस्पृहपणे या संस्थेचे कामकाज चालले असून, राज्यातील आदर्श बाजार समिती म्हणूनही लौकिक आहे. 

ते म्हणाले, विलासकाकांच्या एका संघर्षमय निवडणुकीत मी मतदान केंद्र प्रतिनिधी होतो. ठराविक पातळीवर आमच्यात मतभेद झाले. परंतु काकांना एकवेळ मी भेटलो, त्यावेळेस अनेक वावड्या उटल्या. काकांनी त्यावेळेस मी आणि उदयसिंह समाजाची प्रतारणा करणार नाही. असा शब्द मला त्यांनी दिला. काकांच्यानंतर ही पहिली निवडणूक आहे.

ते म्हणाले, सहकारातील संस्था काकांनी निस्पृहपणे उभा केल्या. त्यांनी तयार केलेली माणसं आयुष्यभर विसरणार नाहीत. बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचे इमान राखण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीला व्यापक स्वरूप आले आहे. राज्याच्या राजकारणात अस्थिर परिस्थिती असताना निवडणुकीकडे मतदारांनी वेगळ्या नजरेने बघितले पाहिजे. लोकनेते विलासराव पाटील - उंडाळकर रयत पॅनेलने सर्वसामान्य लोकांना संधी दिली आहे. आमच्याकडे धनदांडगे व कोणी मोठ्याचा मुलगा उभा नाही.

उदयसिंह पाटील म्हणाले, विलासकाकांनी अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांना सत्तेमध्ये स्थान दिले. हे करत असताना काही प्रस्थापित मंडळी घुसली. आणि तीच मंडळी आपल्या समोर लोकशाहीला बगल देवून मतदारांवर दबाव आणत आहेत. प्रस्थापित मंडळींना सत्तेसाठी व काहींना आमदारकीसाठी बाजार समितीची सत्ता हवी आहे. प्रस्थापित आणि सरंजामदार हे सूत्र बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र आले आहे. सर्वसामान्य लोकांना गुलाम बनवण्याच्या विचारातून ही मंडळी कार्यरत आहेत. त्यातून समाजाला वाचवण्यासाठी लढा उभा केला पाहिजे. या भूमिकेतून वाटचाल सुरू आहे. विलासकाकांनी संघर्ष केला. तो संघर्ष घेवून मी पुढे चाललो आहे. तुम्ही या संघर्षात या. बाजार समितीचा गुलाल हा तुमचाच आहे.

डॉ. सुधीर जगताप, प्रा. राजेंद्र भिसे, फरिदा इनामदार, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, शिवराज मोरे, अजितराव पाटील - चिखलीकर यांची भाषणे झाली. बी. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

अजितराव पाटील - चिखलीकर म्हणाले, काल - परवा उंडाळे भागात एक बडे बाबा आले होते. त्यांनी या भागाचे पालकत्व घेणार म्हणून सांगितले. अहो तुम्ही अगोदर कालवडे - बेलवडे योजना सुरू करा. अहो तुमच्या गावचा पुल तुम्हाला दुरुस्त झाला नाही. असा टोला अतुल भोसले यांचे नाव न घेता लगावत ते पुढे म्हणाले, यशवंतराव मोहिते यांनी येवती - म्हासोलीचे धरण बांधले. विलासराव पाटील - उंडाळकर यांनी डोंगरी भाग सुजलाम सुफलाम केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना अठराशे कोटी रुपयांचा निधी आणला. त्यामुळे विरोधकांनी आमची काळजी करू नये, असा मार्मिक टोला शेवटी त्यांनी लगावला.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक