कराडात पाणीपट्टी आकारणी विरोधात पाण्यात उतरुन आंदोलन...
कराडात पाणीपट्टी आकारणी विरोधात पाण्यात उतरुन आंदोलन...
कराड दि.31-(प्रतिनिधी) कराड शहरात 24 तास योजना अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपट्टी आकारणी विरोधात विविध संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा व पाणीपट्टीची आकारणी ही पूर्वीच्या वार्षिक आकारणी प्रमाणेच करण्यात यावी या मागणीसाठी आज कराडच्या कृष्णा कोयना नदीपात्रात विविध संघटनांच्यावतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. मानव कल्याणकारी संघटना, भीम आर्मी संघटना व समता सामाजिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की कराड शहरातील वाढीव पाणी बिले संदर्भात कराड शहरातील नागरिकांनी व विविध संघटनेच्या व राजकीय पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले देऊन आंदोलने केलेली आहेत. आज रोजी सदरची 24 तास पाणी योजना पूर्ण झालेली नाही. असे असताना 24 तास पाणी योजनेच्या दराने बिले दिलेली आहेत. प्रत्यक्षात दोन वेळचे पाणी मिळत असून सध्या केलेली दर आकारणी अन्यायकारक आहे, ती रद्द करुन पूर्वीप्रमाणे वार्षिक बिले देण्यात यावीत व पाणी योजना पूर्ण कराड शहरांमध्ये सुरू झाल्यानंतर बिलांची आकारणी करण्यात यावी. अन्यथा कराड शहरांमध्ये जन आंदोलन उभे केले जाईल याची सर्व जबाबदारी नगरपरिषदेची राहील असा इशारा ही निवेदनात दिला आहे.
या निवेदनावर मानव कल्याणकारी संघटनेचे संस्थापक सलीम पटेल, भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी, समता सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्या सह्या आहेत. सदरचे निवेदन मुख्याधिकारी कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड, तहसीलदार कराड व जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आले आहे.

Comments
Post a Comment