उंडाळे विभागातील जलसमृद्धीसाठी पृथ्वीराजबाबा कटिबध्द : इंद्रजित चव्हाण....
उंडाळे : येथे दक्षिण मांड नदीवरील केटी वेअर बंधारे उभारणीचे भूमिपूजन करताना इंद्रजित चव्हाण, समवेत उदयसिंह पाटील, संगीता माळी, उदय पाटील व इतर
उंडाळे विभागातील जलसमृद्धीसाठी पृथ्वीराजबाबा कटिबध्द : इंद्रजित चव्हाण....
कराड दि.25 : माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर यांनी कराड दक्षिणमध्ये डोंगरी विभागाचा कायापालट केला. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वर्गीय विलासराव पाटील - उंडाळकर यांच्या पश्चात उंडाळे विभागातील विकासाच्या कामांना खंड पडू दिला नाही. काले, उंडाळे, मनव व टाळगाव येथे दक्षिण मांड नदीवर केटी वेअर बंधारे उभारणीसाठी तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी देत या विभागातील विकासाचे नाते अधिक घट्ट ठेवले आहे. यातून उंडाळे विभागात जलसमृध्दीसाठी पृथ्वीराज बाबा कटिबध्द आहेत. असे मत युवा नेते इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले.
उंडाळे (ता. कराड) येथे दक्षिण मांड नदीवर महादेव मंदिराजवळ जलसंधारण विभागाच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन सहकारी रयत साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील व युवा नेते इंद्रजीत चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.
सरपंच संगिता माळी, उपसरपंच शोभा शिंदे, कराड दक्षिण काँग्रेसचे सरचिटणीस उदय पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील, धनाजी पाटील, स्वा. सै. शामराव पाटील पतसंस्थेचे संचालक अशोक पोळ, आर. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. चव्हाण म्हणाले, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले असून, उंडाळेच्या विकासाला आणखी गती देत यापुढेही ते विकासकामे राबविण्यासाठी कमी पडणार नाहीत.
उदयसिंह पाटील म्हणाले, उंडाळे येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला 36 लाख रुपये खर्च येणार असून, या बंधाऱ्याची उंची नऊ ते दहा फूट असणार आहे. व त्यावरून दुचाकीची ये - जा करता येणार आहे. या बंधाऱ्यातून साठवण होणाऱ्या पाण्याचा सुमारे 30 एकर क्षेत्राला लाभ होणार आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
दरम्यान बंधाऱ्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण होईल, असे यावेळी जलसंधारण विभागाच्यावतीने सांगण्यात आले. उदय पाटील यांनी प्रास्ताविक केले. ग्रामसेवक शरदचंद्र चव्हाण यांनी आभार मानले.
काँग्रेसचे सरचिटणीस उदय पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या सहकार्याने दक्षिण मांड नदीवर जलसंधारण विभागामार्फत उंडाळे व काले येथे दोन केटी वेअर बंधारे तसेच वारणा प्रकल्पातंर्गत मनव, उंडाळे व टाळगाव येथे नियोजीत तीन केटी बंधारे उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यामुळे शेकडो एकर शेती व लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

Comments
Post a Comment