यशस्वी होण्यासाठी युवकांनी वैचारीक क्षमता वाढवावी - डॉ. राधाकृष्णन पिल्लई...
यशस्वी होण्यासाठी युवकांनी वैचारीक क्षमता वाढवावी - डॉ. राधाकृष्णन पिल्लई...
कराड, दि. 25- युवकांना व्यवसायात सुरू करायचे असतील; तर त्यासाठी स्वत: पात्र व्हावे. त्यासाठी युवकांनी वैचारीक क्षमता वाढवणे आवश्यक असून त्यांनी चाणक्य नीतीचे अवलोकन करणे ही सध्याच्या युगाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते, प्रशिक्षक व वैयक्तिक मार्गदर्शक डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी व्यक्त केले.
येथील दि कराड अर्बन बँकेच्या 106 व्या वर्धापनदिनानिमित्त बँकेच्या शताब्दी सभागृहात कै. वा. ग. तथा आण्णासाहेब चिरमुले ट्रस्ट सातारा व दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता विकास शिबिरात कॉलेज युवक-युवतींना मार्गदर्शन करताना डॉ. पिल्लई बोलत होते.यावेळी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्याधिकारी सीए. दिलीप गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पिल्लई म्हणाले, कराड अर्बन बँक दूरदृष्टी ठेवून आधीच पुढील एका वर्षाचे नेटके नियोजन करणारी बँक असल्याने ही बँक सहकारी वित्तीय क्षेत्रामध्ये घट्ट पाय रोवून स्थिरावलेली आहे. उपस्थित सर्व विद्यार्थी हे कराड व परिसरातील आहात यामुळे आपण भविष्यात कितीही मोठे उद्योजक झालात, जगाच्या कोणत्याही कोपर्यात गेलात तरी आपले कराड अर्बन बँकेत खाते असणे आवश्यक आहे, कारण कराड अर्बन बँक ही आपली मातृसंस्था आहे.असे ही पिल्लई म्हणाले.
डॉ. राधाकृष्णन पिल्लई म्हणाले, उद्योजक होण्यसाठी स्वत:कडे नेतृत्व गुण असणे आवश्यक आहेत. यासाठी फक्त स्वत: मार्गदर्शन घेणे आवश्यक नसून इतरांना सुद्धा योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी तरूणांनी छंद जोपासत किमान एक तरी ध्येय निश्चित करायला हवे आणि हे ध्येय निश्चित करत असताना राष्ट्रहीतास प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण जो इतरांचा विचार करतो तोच नेतृत्व करण्यास पात्र असतो. यासाठी युवकांनी आर्य चाणक्य यांनी योग्य लिडर होण्यासाठी सांगितलेल्या एकूण 36 गुणांपैकी स्वाध्याय; वृद्धसंयोग:, मित्र संबंध: व अन्विक्षिकी या 4 गुणांचे आकलन वैयक्तीक जीवनात करणे आवश्यक आहे.
युवकांनी भविष्याबाबत चिंता न करता चिंतन करायला पाहिजे. यासाठी प्रत्येक युवकाने विचार करण्याची क्षमता वाढविली पाहिजे. वैचारिक क्षमता वाढविण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. ज्ञानाची ताकत हे पुस्तके वाढवतात. यासाठी युवकांनी रोज किमान एक तास तरी वाचन करावे असे आवाहन ही डॉ.राधाकृष्णन पिल्लई यांनी यावेळी केले.
आजचा युवक बदलत्या तंत्रज्ञानामुळे नशीबवान ठरत आहे. त्यांना चांगले वाईट सर्व गोष्टी लगेच समजत आहेत.परंतू या सगळ्यामध्ये त्यांच्यामध्ये जागतिक दु:ख साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे, अभासी जगत आहेत असे न जगता तंत्रज्ञानाचा वापर चांगले विचार मांडण्यासाठी करायला हवा. थोरपुरूषामचे अनुकरण हे फक्त पेहरावा व दिखाव्या पुरतेच न करता आचरणासाठी व विचारांचा वारसा जपण्यासाठी करणे गरजेचे आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव यांनी स्वागत, प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांची ओळख करून देत असताना, डॉ.राधाकृष्णन पिल्लई यांच्या शैक्षणीक तसेच विविध ठिकाणी केलेल्या कार्याची माहिती दिली. आजच्या धकाधकीच्या जीवनात उद्योगव्यवसाय, समाजकारण अथवा घर संसार सांभाळत येणार्या संकटांतून तरून निघायचे असेल तर प्रत्येकाला योग्य गुरूंचा आशिर्वाद व मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. तसेच आजकाल प्रत्येकाची जगण्यासाठी, स्वत:ला समृद्ध करण्यासाठी स्वत:शीच लढाई सुरू असते आणि ही लढाई यशस्वी रीतीने जिंकण्यासाठी आजच्या युगात चाणक्य नीतिचा अवलंब करणे आवश्यक आहे. हे ओळखूनच सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरू आर्य चाणक्य यांच्या विषयी आवड असणारे प्रभावी वक्ते, उत्तम मार्गदर्शक व अनेक उद्योजक निर्माण करणारे डॉ.राधाकृष्णन पिल्लई यांना बँकेने यंदाच्या उद्योजकता विकास शिबिरासाठी निमंत्रित केले आहे, असे सांगत सीए. दिलीप गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
डॉ. सुभाष एरम म्हणाले, अर्बन बँक नहेमीच तरूण उद्योजकांना पतपुरवठा करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहत आलेली आहे. डॉ.राधाकृष्णन पिल्लई यांच्या आजच्या मार्गदर्शनातून उपस्थित विद्यार्थी प्रोत्साहीत होवून नक्कीच नवीन व्यवसाय संधी शोधतील, असा विश्वास व्यक्त करून बँकेचे अध्यक्ष डॉ. एरम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी डॉ.राधाकृष्णन पिल्लई यांचा बँकेच्यावतीने कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी व मुख्याधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक मंडळ, कराड परीसरातील हजारो महाविद्यालयीन विध्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बँकेच्या विधी अधिकारी स्नेहांकीता नलवडे यांनी केले. यावेळी आयोजित चर्चासत्रात प्रसाद देसाई, आकाश राठोड व इशा गुजर या तीन विद्याथ्यारनी शंका विचारून सहभाग घेतला.
कराड अर्बन बँकेच्या 106 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न...
दि.24 जानेवारी रोजी बँकेचा 106 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने कराड येथील मुख्यकार्यालय इमारतीमध्ये सकाळी 8.30 वा. सत्यनारायण पुजा संपन्न झाली. त्यानंतर सकाळी 11 वा. संचालक मंडळ सभा पार पडली. यामध्ये बँकेच्या संचालिका रश्मी सुभाष एरम व महाव्यवस्थापक सलीम शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव आणि संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Comments
Post a Comment